आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लक्षवेधी:मराठवाड्यात रुग्णसंख्या घटली, पण मृत्यूंचे आकडे चिंताजनक

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लातूरमध्ये दरदिवशी 30 च्या वर मृत्यू; परभणी, उस्मानाबादेतही उपाययोजनांची गरज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. पण गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु लातूर, परभणी व उस्मानाबादसारख्या शहरात मृतांचा आकडा कमी व्हायला तयार नाही. यावर आळा घालण्याच्या दृष्टीने आता आणखी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आठही जिल्ह्यांचा विचार करता रुग्णसंख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही बरीच घट झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दुसरी लाट सुरू झाली तेव्हा एकवेळ दरदिवशी ६,५०० रुग्ण सापडत होते. ते आता ३,५०० पर्यंत आले आहेत. बुधवारी तर आठ जिल्ह्यांमध्ये ३,८८८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दुसरीकडे ४,८२८ जणांची रुग्णालयातून सुटी झाली. बुधवारी अनेक दिवसानंतर मृतांचा आकडा ९३ वर होता. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३२ हजार ४४० वर जाऊन पोहोचली आहे. लातूर जिल्ह्यातील मृत्यूंचा आकडा चिंताजनक आहे. येथे दररोज ३० ते ३७ रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. मागील आठवडाभरात परभणीतही मृतांचा आकडा १० ते २० च्या आत आहे. उस्मानाबादमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याचे तज्ज्ञांना वाटते. नांदेडमध्ये मात्र रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे. येथे मृतांचा आकडाही आवाक्यात आल्याचे दिसते. बीड जिल्ह्यात सातत्याने पॉझिटिव्ह व मृत्यूचा आकडा वाढताच आहे. हिंगोली एकटा असा जिल्हा आहे जेथे सातत्याने रुग्णसंख्या व मृतांचा आकडा कमी आहे.

पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड स्थिती जाणणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यात राज्यातील १७ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार अाहेत. मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद, जालना आणि लातूर या पाच जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

मराठवाड्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी अद्यापही फारशी नियंत्रणात आलेली नाही. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असून मृत्यूही वाढत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हास्तरावर होत असलेले प्रयत्न, लसीकरण, केंद्राकडून अपेक्षित मदत याबाबत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून ग्राउंड झीरोवरील स्थितीची माहिती घेणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता ही व्हिडिओ कॉन्फरन्स होणार असून राज्यातील १७ जिल्ह्यांची निवड केली गेली आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहेे. यात मराठवाड्यातून बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद व परभणी या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्तही या व्हिडिओ काॅन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...