आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचा जीव धोक्यात:पेट्रोलवर धावणाऱ्या जुन्या एक हजारांवर रिक्षाचालकांनी परस्पर बसवले गॅस किट

औरंगाबाद / संतोष देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पेट्रोलवर धावणाऱ्या एक हजारांहून अधिक ऑटोरिक्षाचालकांनी परस्पर एलपीजी गॅस किट बसवले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रोज वाहतुकीचा बोजवारा उडतोय. आरटीओ व पोलिस मात्र डोळे असून आंधळ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे गैरप्रकार व अवैध प्रवासी वाहतूकही वाढली आहे.

शहरात ३५ हजारांवर ऑटोरिक्षा आहेत. प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने दिवसेंदिवस ऑटोरिक्षांच्या संख्येतही वाढ होत आहे. नवीन रिक्षा खरेदी करताना एलपीजी, पेट्रोल, सीएनजी यापैकी एक पर्याय निवडून त्यानुसार आरटीओची परवानगी घ्यावी लागते. पेट्रोल दरात प्रचंड वाढ झाली आहे. जुन्या रिक्षांचे अॅव्हरेज कमी येते. पेट्रोल खर्चाच्या तुलनेत एलपीजी सिलिंडर बसवले तर परवडते. मात्र, जुन्या रिक्षांना गॅस किट बसवण्याची परवानगी आरटीअोकडून घ्यावी लागते. ती न घेताच ऑटोरिक्षा चालक-मालक परस्पर किट बसवून घेत आहेत. आजवर १ हजारांहून अधिक रिक्षाचालकांनी गैरमार्गाने गॅस किट बसवून घेत प्रवासी वाहतूकही सुरू केली आहे. त्याची तपासणी होत नाही. परिणामी, गैरमार्गाने गॅस किट बसवून घेण्याचा धंदा तेजीत सुरू आहे.

पोलिस व आरटीओंचे अक्षम्य दुर्लक्ष : ऑटोरिक्षा फिटनेस, विमा, परवाना, क्यूआर कोड न लावणे, गणवेश परिधान न करणे, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध गॅस किट बसवणे, कुठेही रिक्षा थांबवणे, कर्कश हॉर्न, अश्लील हावभाव करणे, माेठ्या आवाजात प्रवाशांना बोलणे आदींचे सर्रास उल्लंघन होत आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

गैरप्रकार, अवैध प्रवासी वाहतूक थांबवा
आरटीओ व पोलिस १०० ते २०० रुपयांची पावती देऊन थातूरमातूर कारवाई करतात. यामुळे शहर वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. विनापरवानगी एक हजारांहून अधिक पेट्रोल रिक्षांना एलपीजी गॅस किट बसवले आहेत. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करावी. अवैध प्रवासी वाहतुकीबराेबरच सर्व गैरप्रकार थांबवावे. यासाठी आम्ही मागणी करतो. मात्र, पोलिस व आरटीओ दुर्लक्ष करत आहेत.
-निसार अहेमद खान, अध्यक्ष, ऑटोरिक्षाचालक संयुक्त कृती महासंघ

उद्या भाडेवाढीचा निर्णय होण्याची शक्यता
ऑटोरिक्षा चालक-मालकांकडून भाडेवाढीसाठी सतत मागणी होत आहे. परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी पहिले शिस्त लावा नंतर भाडेवाढ देतो, असे सांगितले. तर खुद्द ऑटोरिक्षाचालकांनी गैरप्रकार व अवैध प्रवासी वाहतूक थांबवण्याची मागणी केली आहे. त्यावर पोलिस व आरटीओंनी ठोस पाऊल उचलेले नसले तरी रिक्षा भाडेवाढीचा निर्णय ६ सप्टेंबरला सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...