आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:दुकानातील आग विझविताना शॉक लागून मालकाचा मृत्यू, आगीमुळे इतरांना मदतीसाठीही जाता आले नाही

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कष्टाने उभ्या केलेल्या दुकानाने मध्यरात्री अचानक पेट घेतला. ही बाब कळताच दुकान मालकाने कुटुंबासह आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र, वीज मीटरमधूनच शॉर्टसर्किट झाल्याने विद्युतप्रवाह उतरलेल्या गेटला हात लागला अन् जोरदार झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. वसंत पंढरीनाथ घोडके (५८) असे मृताचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजता पुंडलिकनगरात ही घटना घडली.

घोडके नुकतेच बजाज कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. दोन मुले, पत्नीसह ते पुंडलिकनगरात वास्तव्यास होते. त्यांचा एक मुलगा नोकरी करतो. दुसऱ्या मुलासाेबत ते त्याच परिसरात डेली नीड्सचे दुकान चालवत. शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दुकानातून मोठा आवाज आला. स्थानिकांना हा प्रकार समजताच त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा घोडके यांच्या दुकानातून धूर येत होता.

घोडके यांना हा प्रकार कळताच त्यांनीही दुकानाकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यातच शॉर्टसर्किट झाल्याने दुकानातील काही उपकरणांचा स्फोट झाला होता. परिणामी, मुख्य वायरमध्ये वीज उतरली. दुकानाच्या लॅच गेटच्या वरूनच वीजपुरवठा करणारे मुख्य वायर गेले होते. आग विझविण्यासाठी धाव घेतलेल्या घोडके यांनी सर्वप्रथम तेच गेट उघडण्याचा प्रयत्न केला. हाताचा स्पर्श होताच त्यांना विजेचा झटका बसला. आगीमुळे त्यांच्या मदतीसाठी धावणे इतरांना शक्य झाले नाही. अग्निशमन विभागाने धाव घेतल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.