आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षभरात साधारणपणे १ हजार ते ११०० रुग्ण खुब्याचे हाड मोडल्यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी येतात. यातील ९० टक्के रुग्ण ६० वर्षांवरीलआहेत. खुब्याच्या फ्रॅक्चरवर सामान्यत: वाटी किंवा गोळा बदलण्यात येतो. पण त्यामुळे आगामी पाच वर्षांत रुग्णाला पुन्हा शस्त्रक्रियेची गरज भासते, शिवाय कायम वेदना सहन कराव्या लागतात. मात्र, घाटीतील निवासी डॉ. सुफियान चौधरी यांनी खुब्याचा गोळा, वाटी बदलून सिमेंट भरून पॅक केल्याने वेदना, दुसऱ्या शस्त्रक्रियेपासून रुग्णाची सुटका झाली. खुबा म्हणजे मांडीचे हाड कमरेच्या हाडात गुंतवलेला उखळी सांधा. यातील मांडीच्या हाडाला एक तिरपे टोक व त्यावर चेंडूसारखा भाग असतो. या सांध्यावर जाड पडदे असतात. मांडीच्या हाडाचा हा फांदीसारखा भाग सांध्यात किंवा सांध्याबाहेर तुटतो. अगदी किरकोळ कारण - घसरणे याला कारणीभूत ठरते.
कधी कधी पुरेसे कारण नसतानाही हा भाग तुटतो. त्यामुळे रुग्ण अंथरुणाला खिळून जातो. उठून बसणे, कुशीवर वळणे अशा हालचालीही करू शकत नाही. अंथरुणावर टेकलेले भाग सडून तेथे व्रण तयार होतात. हळूहळू त्यातून सर्व शरीरातच जंतुदोषाची लागण होते. संशाेधानात नेमके काय केलेॽ
वर्षभरात घाटीत १ हजार ८० खुब्याचे फ्रॅक्चरच्या रुग्णांवर उपचार केले. यात काहींवर खुब्याचा गोळा आणि वाटी बदलून त्यात सिमेंट भरण्याची शस्त्रक्रिया केली, तर काहीत फक्त वाटी किंवा गोळा बदलण्याची शस्त्रक्रिया केली. या दोन्ही प्रकारच्या रुग्णांचा अभ्यास डॉ. सुफियान यांनी केला. ज्या रुग्णांमध्ये फक्त एकच गोष्ट बदलण्यात आली त्यांना मांडीत वेदना होण्याचा त्रास होता, तर पाच वर्षांनंतर नव्याने शस्त्रक्रियेची गरजही भासत असल्याचे लक्षात आले. पण ज्या रुग्णांमध्ये खुब्याचा गोळा आणि वाटी दोन्ही बदलण्यात आले तसेच सिमेंट भरून त्याला पॅक केले त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. त्याच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रियेची गरजही भासली नाही. सिमेंट भरण्यामुळे हाडांच्या पोकळीत हालचालींमुळे दुखापत होण्याचा धोका टाळता आला. त्यामुळे वेदना पूर्णपणे नष्ट झाल्या.
स्वत:च्या पायावर चालू शकतात ८४ वर्षीय हरिपंत वाघ यांच्यावर खुब्याची वाटी आणि गोळा बदलण्याची शस्त्रक्रिया केली. चालताना घसरल्याने त्यांचे खुब्याचे हाड मोडले होते. ते अंथरुणाला खिळून होते. पण शस्त्रक्रियेनंतर आता ते स्वत:च्या पायावर चालू शकतात.
छोटे संशोधन, मोठा फायदा देणार डॉ. सुफियान यांनी रुग्णांमध्ये दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर दिसून आलेल्या परिणामांचा आभ्यास केला. या संशोधनामुळे उपचारांत बदल होईल. हे छोटे संशोधन मोठा फायदा देणारे आहे. - डॉ. एम. बी. लिंगायत, अस्थिरोग विभागप्रमुख, घाटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.