आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २० पैकी १४ जागा जिंकून शेतकरी विकास पॅनलने गड राखला. पण माजी संचालक तथा पॅनल प्रमुख हरिभाऊ बागडे व अभिजित देशमुख यांचा दारूण पराभव झाला आहे. तर आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ काळे, अभिषेक जैस्वाल आणि अॅड. देवयाणी डोणगावकर व त्यांचे पती कृष्णा डोणगावकर यांनी विजय संपादन करत नव्याने संचालक झाले आहेत.
जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा ध्वज फडकवण्याची भीम गर्जना शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे व काँग्रेस जिल्हा प्रमुख डॉ. कल्याण काळे यांनी केली होती. प्रत्यक्षात बागडे व मंत्री संदीपान भुमरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे व सतीश चव्हाण यांना गोटात घेऊन महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरले. तसेच नितीन पाटील हेच अध्यक्ष असतील असे जाहीर करून त्यांनी राजकीय डाव टाकला होता. त्याला डॉ. काळे, सुभाष झांबड, कैलास पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर, संजय वाघचौरे यांनी स्वतंत्र शेतकरी सहकारी बँक विकास पॅनल उभे करून आवाहन दिले. यामुळे सर्वच दिग्गजांना प्रचार व प्रसार करताना घाम फुटला होता. बागडे विरूद्ध काळे असाच हा थेट सामना झाला. यात बागडे पॅनलला यश मिळाले. पण बागडे व देशमुख पराभुत झाल्याने मोठा धक्का बसला आहे.
अटीतटीचा सामना
बँकेच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात प्राथमिक पतपुरवठा वि. का. मतदार संघातील ७ जागेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली. त्यापैकी ५ बागडे पॅनलने तर २ काळे पॅनलचे उमेदवार विजयी. प्रक्रिया मतदार संघातून मंत्री अब्दुल सत्तार यांनी बहुमतांनी विजय संपादन केल्यानंतर सत्तार, भुमरे, बागडे यांच्यासह सर्व उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणी हजेरी लावून विजयी पोज दिली होती. त्यानंतरच्या बिगर शेती संस्था मतदार संघ, महिला सदस्य मतदार संघ, प्राथमिक पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संघ, इतर मागासवर्गी मतदार संघात अटीतटीचा सामाना झाला. दिग्गज संचालकांचा परभवातून व नवीन चेहऱ्यांना विजय मिळल्याने जिल्ह्यातील राजकीय वारे बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गड आला पण सिंह गेला
पॅनल प्रमुख तथा माजी संचालक ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला यावर विश्वास बसत नाही. या पराभवामुळे गड आला पण सिंह गेला, असे आम्हाला वाटते. मतदारांनी जो आमच्या पॅनलवर विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ करू. असा विश्वास मंत्री संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
निवडणुकीनंतर सत्तारांचा घुमजाव
निवडणूक पूर्वी अध्यक्ष पदी नितीन पाटील यांचीच निवड व्हावी, यासाठी सर्वप्रथम मीच नाव सुचवले होते. त्यांच्या नावाला कुणाचा विरोधही असण्याचे कारण नाही. पण आता निवडणुकीचे निकाल स्पष्ट झालेले आहेत. आम्हाला बहुमत मिळालेले आहे. तेव्हा सर्व नवीन संचालक मंडळ बसून अध्यक्ष कोणाला करायचे हे एकमताने ठरवू. असा घुमजाव करून सत्तार यांनी राजकीय बाँम्ब गोळा टाकला आहे.
बागडेंचा पराभव काळेंचा विजय
बागडे व काळे यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. बँकेच्या निवडणुकीतही शिवसेनेचे आ. अंबादास दानवे, एनसीपीचे आमदार सतीश चव्हाण व अभिजित देशमुख सत्ताधारी पक्षात गेले. याचे दुख न करता डॉ. काळे यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून जोरदार प्रचार व प्रसार केला. निवडणुकीला काही दिवस बाकी असताना त्यांना कोरोनाने गाठले. असे असतानाही त्यांनी मतदारांना आवाहन केले होते. त्याला काही प्रमाणात का होत नाही यश आले असून त्यांच्या गटातील ५ संचालक निवडून आले आहेत. त्यात डोणगावकर पती पत्नीचा समावेश आहे. बागडे यांचा दारून पराभव काळेंचा विजय मानला जाऊ लागला आहे.
अपक्ष जैस्वाल विजयी
भाजपचा कार्यकर्ता असलेल्या अभिषेक जैस्वाल यांनी निवडणुकीचे तिकिट मागीतले होते. यासाठी भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. पण बागडे, सत्तार, भुमरे यांनी त्यांचे एकले नाही. यामुळे अभिषेकने अपक्ष निवडणूक लढवून ती जिंकली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर बागडे यांना त्यांचा स्वभाव नडला अशा चर्चेला उधाण आले होते. तर पैसा जिंकला अशी टिका देखील काहींना केली.
विजयाचा जल्लोष
विजयी उमेदवारांचे नाव घोषित होताच उमेदवार स्वत आनंदात जल्लोष करत होते तर बँक परिसरात गुलाल उधळून, पुष्पहार घालून व एकमेकांची गळाभेट, हस्तांदोलन, पेडे भरवून आनंद साजरा करण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.