आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:पक्षाला व माजी खासदार राजीव सातव यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने काम करणार : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञा सातव

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • डॉ. प्रज्ञा सातव यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी नेत्यांनी आपल्यावर सोपवली आहे. पक्षाला व माजी खासदार राजीव सातव यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने राज्यात काम करणार असल्याचे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञा सातव यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. माजी खासदार राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. देशामध्ये निवडणूका तसेच गरजेच्या वेळी खासदार सातव मदतीसाठी धावून गेले. मात्र कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सातव कुटुंबियातील व्यक्तीं राजकारणात काम करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर पक्षाने माजी खासदार सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

या निवडीनंतर बोलताना डॉ. प्रज्ञा सातव म्हणाल्या की, पक्षाने प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबतच पक्षातील वरिष्ठ नेते तसेच माजी मंत्री रजनी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत.हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचे माजी खासदार राजीव सातव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधणार असून तरुणाईला पक्षाकडे वळवून त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे असे माजी खासदार सातव यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. या शिवाय इतर अनेक प्रश्न आहेत. त्याबाबतही लवकरच निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल. माजी खासदार सातव यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणार असून जिल्हा स्तरावर विकास कामासंदर्भात पक्षाचे नेते कार्यकर्ते यांची बैठक घेऊन विकासाचा ॲक्शन प्लॅन तयार केला जाईल. माजी खासदार सातव यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करणार असल्याचेही डॉ. प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले.

डॉ. प्रज्ञा सातव यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
माजी खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांसमोर मोठे संकट उभे होते. हिंगोली जिल्ह्यात आता पक्षाचे पुढे काय? असे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र डॉ. सातव यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर होताच जिल्हाभरातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सोशल मीडियावर अभिनंदनाचे संदेश झळकू लागले आहेत. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसू लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...