आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपातील नोकरभरतीसाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले.महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे. त्यासोबतच राज्य शासनाने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर करताना ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे.
महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करू शकते. शासनाने नोकर भरतीच्या अनुषंगाने सेवा भरती नियमही मंजूर केले आहेत. त्यामुळे नोकर भरती सुरू होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदुनामावली ठरवणे गरजेचे असल्याने शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधाची बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम विभागीय आयुक्त कार्यालयातून करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, शासनाने बिंदूनामावलीच्या नियमात बदल केला.
शासनाने मंजूर केलेल्या नवीन आकृतिबंधात काही पदे सरळ सेवाभरतीने भरली जाणार आहे. काही पदे प्रतिनियुक्तीवर भरली जाणार आहेत. बिंदु नामावलीच्या नवीन आदेशानुसार आरक्षित व सरळ सेवाभरती-प्रतिनियुक्तीचे प्रमाण या दोन्ही बाबींची निश्चिती प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यानुसार बिंदू प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यास सरळ सेवेची पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल. राज्य शासनाने बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर भरतीचा मार्ग मोकळा होईल. तरी प्रत्यक्षात टप्प्या-टप्याने भरती होण्याची शक्यता आहे. महत्वाची पदे प्राधान्यान्याने भरली जातील, असे नेमाने यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.