आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पोलिस बनले शेतकऱ्यासाठी देवदूत, वेळीच उपचार मिळाल्याने वाचले प्राण; सरकळी शिवारातील घटना

हिंगोली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील सरकळी शिवारात शनिवारी (5 सप्टेंबर) उडीद पिकाची मळणी करताना मळणी यंत्रात हात अडकल्याने मोठा रक्तस्त्राव होत असलेल्या शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळीच शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे पोलिस त्या शेतकऱ्यासाठी देवदूतच बनल्याचे बोलले जात आहे.

हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील शेषराव शंकर सोमोसे (55) यांच्या शेतात आज सकाळ पासून उडीदाची मळणी केली जात होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोमोसे यांचा हात मळणी यंत्रात गेला. त्यामुळे ते यंत्रात ओढले जात असल्याचे लक्षात येताच तेथे काम करणाऱ्या मजुरांनी तातडीने यंत्र बंद केले. मात्र त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी वाहन देखील थांबत नव्हते.

दरम्यान, याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार शंकर जाधव, आकाश टापरे, विठ्ठल काळे यांचे पथक तपासासाठी सेनगावकडे जात होते. सरकळी शिवारात गर्दी पाहून उपनिरीक्षक घेवारे यांनी वाहन थांबवून शेतात धाव घेतली. त्या ठिकाणी घडलेला प्रकार पाहून सोमोसे यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्याच्या हालचाली सुरु केल्या. एका वाहनातून त्यांना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. शिवाय त्यांच्यावर औषधोपचारासाठी मदत केली. शेतकरी सोमेसे यांच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली असली तरी वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहे.

शेतकऱ्याचे प्राण वाचणे महत्वाचे होते : शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली

सेनगाव येथे तपासाला जात असतांना शेतातील गर्दी पाहून तेथे पोहोचलो. घटनास्थळी शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तपासाचे काम बाजूला ठेवत त्यांना तातडीने उपचारासाठी घेऊन आलो. त्यांना रक्ताची गरज भासल्यास गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्तदानाची तयारी आहे. तपासापेक्षा शेतकऱ्याचे प्राण वाचणे महत्वाचे होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser