आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळसूत्र चोर भरधाव वेगाने दुचाकीवर निघून गेला. पोलिस त्यांचा पाठलाग करण्याचे धैर्य दाखवू शकले नाहीत, असे अनेकदा म्हटले जाते. पण मंगळवारी (१४ जून) वटपौर्णिमेच्या दिवशी पोलिस धैर्यवान झाले. गारखेड्यातून ६० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या परभणीच्या दोन अट्टल चोरट्यांना त्यांनी पाऊण तासात जालना रोडवर पकडले. वटपौर्णिमेला सोनसाखळी चोर हैदोस माजवत असल्याने सोमवारीच पोलिसांनी तयारी केली होती. सकाळी आठ ते रात्री आठ शहरातून बाहेर जाणाऱ्या अकरा मार्गांवर कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नियंत्रण कक्षाकडून वर्णन मिळताच केंब्रिज चौकात दोन कर्मचाऱ्यांना तशा वर्णनाचे दुचाकीस्वार गेल्याचे लक्षात आले. त्यांनी पाठलाग सुरू केला. जालना पोलिसांच्या मदतीने टोलनाक्यावर दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हे चोरटे सोमवारी दुपारी बारा वाजता नाशिकमध्ये सोनसाखळी चोरून शहरात आले होते. नाथ प्रांगण, गारखेड्यातील रहिवासी शैलजा विजय देवडीकर (६०) रसिका चव्हाण, अर्चना शिंदेंसोबत वडाची पूजा करण्यासाठी साहस सोसायटीतील गणपती मंदिराकडे विजयनगरात जात होत्या. तेव्हा दुपारी १२.३० वाजता जानकी हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील निम्मे मंगळसूत्र, बेंटेक्सचा हार हिसकावला आणि धूम ठोकली. सोमवारीच नियोजन, अकरा ठिकाणी बारा तास पहारा
अशा प्रकारची घटना घडू शकते, याचा अंदाज असल्याने गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत उभे राहण्याचे आदेश दिले होते. त्यातच देवडीकरांनी चोरीची घटना नियंत्रण कक्षाला कळवली. नियंत्रण कक्षाने वायरलेसवरून सर्वत्र मेसेज पोहोचवला. निरीक्षक संतोष पाटील, दिलीप गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. देवडीकरांनी चोरट्यांविषयी सांगितलेली माहिती बंदोबस्तावरील सर्वांकडे पोहोचवण्यात आली. तेव्हा केंब्रिज चौकातील कर्मचारी संजय नंद, काकासाहेब अधाने यांना काही मिनिटांपूर्वीच अशा वर्णनाचे दोघे जालन्याकडे गेल्याचे लक्षात आले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. शिवाय आघाव यांनाही माहिती दिली. आघाव यांनी तत्काळ जालन्याचे अपर अधीक्षक विक्रांत देशमुख, एलसीबीचे सुभाष भुजंग यांना कळवले. त्यांनी एक पथक जालना टोलनाक्यावर उभे केले. या पथकाच्या हाती कृष्णा शेषराव जाधव (२७, रा. कारेगाव रोड, परभणी) राहुल शेषराव खरात (२२, रा. लोकाशानगर, परभणी) लागले. आराेपींनी २४ तास आधी नाशिकमध्ये केली होती चोरी, फेब्रुवारीत सिडकोतून चोरलेल्या पल्सरचा वापर नाशिकमध्ये हात मारला या चोरट्यांनी नाशिकमध्ये अंबड लिंक रस्त्यावर शशिकला वाघ (५८) यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोनसाखळी १२ वाजता चोरली होती. ती त्यांच्या खिशातच होती. त्यांनी १ फेब्रुवारी रोजी नवजीवन कॉलनीतील कृष्णा गायकवाड (२७) यांची पल्सर चोरली. नंबर प्लेट बदलून ते ती वापरत होते. आघाव यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही चोरटे क्रूर गुन्हेगार आहेत. कृष्णावर लूटमार, मारहाणीचे सहा गुन्हे तर राहुलवर खून, बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून राज्यातील आणखी मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.