आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत सात बडे जुगारी अटकेत:कंपाउंडच्या तारा कापून पोलिस अंधारात रांगत गेले फार्महाऊसमध्ये; जुगार अड्ड्यावर पहाटे छापा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुगार अड्ड्यावरील आरोपींच्या अलिशान गाड्या. - Divya Marathi
जुगार अड्ड्यावरील आरोपींच्या अलिशान गाड्या.

शहरापासून ४८ किलोमीटरवर दूर असलेल्या सिल्लेगावमध्ये (ता. गंगापूर) जवळपास एक एकरमध्ये पसरलेल्या आलिशान फार्महाऊसमध्ये शहरातील गर्भश्रीमंत व्यावसायिकांच्या रंगलेल्या जुगाराचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे तीन वाजता उधळला.

सुरक्षा रक्षकांचा कडेकोट पहारा असलेल्या या फार्महाऊसमध्ये पोलिसांनी कंपाउंडच्या तारा तोडून रांगत जाऊन प्रवेश केला. तिथे जुगार खेळणाऱ्या सात बड्या व्यावसायिकांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून २५ लाख ६० हजार रोख, पाच आलिशान गाड्या असा १ कोटी ८१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वी क्रिकेट सट्ट्यात अटक केलेल्या मनाेज दगडासह युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा आरोपींमध्ये समावेश होता. हे फार्महाऊस दगडाचेच असल्याची माहिती आहे.

शहरातील मोठ्या पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांकडून छापे टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याने आता शहराबाहेर अड्डे सुरू झाले आहेत. सिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारीवर रस्त्यावर दगडा याच्या फार्महाऊसवर अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होते. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांना खबऱ्याकडून या गर्भश्रीमंतांच्या जुगार अड्ड्याची माहिती मिळाली. त्यांनी निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यावरून मंगळवारी उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, अंमलदार लहू थोटे, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, गणेश गांगवे, विजय धुमाळ, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर यांच्या पथकाने पहाटे साडेतीन वाजता छापा टाकला. अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

किमान पाच लाख रुपये असतील तरच डावात प्रवेश : अधीक्षक कलवानीया यांच्या आदेशाने झालेल्या कारवाईची स्थानिक पोलिसांना खबर नव्हती. सात ते आठ खोल्यांच्या या हे फार्महाऊसमध्ये अत्यंत महागड्या साहित्याची सजावट आहे. गेटपासून ३०० मिटरवर असलेल्या फार्महाऊसमध्ये प्रवेश अशक्य होता. तीन ते चार सुरक्षारक्षकांव्यतिरीक्त दरवाजावर निगराणीसाठी माणसे तैनात होती. त्यामुळे पोलिसांनी तारा तोडून अंधारात रांगत मागील बाजुने छापा टाकत थेट वरचा मजला गाठला व जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या वेळी पाचची बँकचा डाव सुरू होता. या डावात किमान पाच लाख रुपये घेऊन बसावे लागते. पुढे डावाची रक्कम वाढत जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी रक्कम लावली गेल्याचे देखील बोलले जात आहे. नेहमी या डावांमध्ये सहभागी असणारा एक क्रिकेट बुकी सोमवारी रात्री गैरहजर राहिला. नसता आणखी लाखो रुपयांची रोख रक्कम हाती लागली असती, असेही सुत्रांनी सांगितले.

फार्महाऊस बुकी मनोज दगडाचे असल्याचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट सट्टा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दगडा देखील यात आरोपी आहे. दगडाला मराठवाड्यात प्रमुख बुकीपैकी एक समजले जाते. त्याच्याच अलिशान फार्महाऊसवर हा अड्डा सुरू झाला. गणेशोत्सवाच्या काळात तो चर्चेत आला. तर दुसरा आरोपी लिंगायत हा युवासेनेचा जिल्हा समन्वयक आहे. इतर सर्व औरंगाबादचे बडे व्यावसायिक आहेत.

बातम्या आणखी आहेत...