आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाधववाडीत बुधवारी राजेश लक्ष्मीदास ठक्कर (५१, रा. समर्थनगर) यांना दोघांनी गोदामात चाकूचा धाक दाखवून लुटले हाेते. पोलिसांना दुचाकी ओळखू येऊ नये म्हणून त्यांनी ‘मॉडिफॉय’ केलेली दुचाकी वापरली. मात्र, एका फुटेजमध्ये दुचाकीच्या मागे लावलेल्या स्टिकरवरून पोलिसांनी त्यांचा माग काढत ४८ तासांत समीर अमजद पठाण (२२, रा. जाधववाडी) आणि अमरीत पालसिंग जबबिरसिंग (२२, रा. पदमपुरा) यांना याप्रकरणी अटक केली.
ठक्कर यांचा प्लास्टिकच्या बारदान्याचा व्यवसाय आहे. १ मार्च रोजी दुपारी गोडाऊनच्या केबिनमध्ये असताना दोघांनी प्रवेश केला. चाकू अंगावर रोखून मारहाण करत १ लाख रोख व अंगावरील हिरे, सोन्याचे जवळपास सात तोळ्यांचे सोने लुटून नेले होते. स्टिकरवरून माग, नंतर देहबोली तपासली लुटारूंनी तोंड बांधलेले होते. दुचाकीच्या नंबरप्लेटवर डांबर लावले होते. दुचाकी ही ‘मॉडिफाय’ केल्याने ओळख स्पष्ट करण्याचे मोठे आव्हान होते. निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार पथकासह याप्रकरणी शोध घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असताना एका कॅमेऱ्यात मात्र दुचाकीवर जोडप्याचे स्टिकर आढळून आले. अवचार यांनी तो धागा पकडत खबऱ्यांकडून शोध सुरू केला. काही खबऱ्यांनी सध्या समीर तशीच दुचाकी वापरत असल्याची माहिती दिली.
त्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून फुटेजमधल्या लुटारूंची व समीरची देहबोली एकच असल्याचे सिद्ध करून घेतले. त्यानंतर अंमलदार सुभाष शेवाळे, गणेश शिंदे, विजयानंद गवळी, विशाल सोनवणे यांनी समीरसाठी सापळा रचून रेणुकामाता मंदिरासमोर नाट्यमयरीत्या बोलावून ताब्यात घेतले. दुसरीकडे दिनकर दंडवते, शिवाजी भोसले, किरण काळे यांनी सापळा रचत अमरीतला पकडले. समीर मोंढ्यात हमाल म्हणून काम करतो. आतापर्यंत दरोडा, लूटमार, खुनाचा प्रयत्नासारख्या गुन्ह्यात दोन वर्षांत तीन वेळा कारागृहात गेला. रेल्वेस्थानक परिसरात गांजा ओढायला जात असताना त्याची अमरीतसोबत ओळख झाली. अमरीत मूळ पंजाबचा असून आरटीओ परिसरातील एका क्रेन व्यावसायिकाकडे काम करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.