आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवे यांचे राजकीय स्थितीवर भाष्य:राजकीय स्थिती गोंधळलेली; उद्या काय होईल याचा नेम नाही

कन्नड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.

कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील युवा उद्योजक मनोज पवार यांच्या विविध शेतीपूरक प्रकल्पाचा शुभारंभ व दिवाळी स्नेहमिलन तसेच कार्यकर्ता आढावा बैठक मंत्री दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पुढे बोलताना ते म्हणाले की, पूर्वी राजा पोटातून जन्माला यायचा, आता मतपेटीतून राजा निवडला जातो. राजकारणात तुमच्या अंगात किती सोने असेल, पण तुमच्यासोबत लोक नसतील तर तुम्हाला काहीच किंमत नाही. यासाठी राजकारण करायचे असेल तर तुमच्यासोबत लोक असली पाहिजेत. भाजपचे गृहमंत्री अमित शहा व उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतरच शिवसेना-भाजप युतीत लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय भाजप राज्यात सरकार बनवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून महाविकास आघाडी केली. या वेळी माजी आमदार नितीन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, माजी जि.प. सदस्या संजना जाधव, युवा उद्योजक मनोज पवार, हतनूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, जेहूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुरेश गुजराणे, माजी उपसभापती सुनील निकम, तालुका सरचिटणीस सुभाष काळे, काकासाहेब तायडे, संतोष शिरसाठ, प्रभाकर बागूल, पवन खंडेलवाल, विलास भोजने, रत्नाकर गुजराणे, माधव भोजने, गोविंद भोजने उपस्थित होते.

कामांवरील स्थगिती उठवायची असेल तर परत गुवाहाटीला जावे कन्नड शहरात निर्मिती महिला सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन मंत्री दानवे त्यांच्या हस्ते रविवारी झाले. या कार्यक्रमाला आमदार उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या वेळी राजपूत यांनी बोलताना सांगितले की, आपले सरकार आले आणि माझ्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली. इतरांची स्थगिती उठवली, तेवढी माझी स्थगिती उठवा, अशी मागणी मंत्री दानवे यांच्याकडे आ. राजपूत यांनी केली. त्याला उत्तर देताना दानवे म्हणाले की, आपण जर गुवाहाटीला गेला असता तर तालुक्यातील विकासकामांना स्थगिती मिळाली नसती. कन्नड तालुक्याच्या विकासकामांवरील स्थगिती उठवायची असेल तर तुम्हाला परत एकदा गुवाहाटीला जावे लागेल, असा टोला मंत्री दानवे यांनी आ. राजपूत यांना लगावला.

बातम्या आणखी आहेत...