आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • The Precedent In Parbhani Nanded Persisted For The Third Day, With Huge Crop Losses; Discharge Of Water Continues From Jayakwadi, Majalgaon, Yeldari, Lower Dudhan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदामाय कोपली:परभणी-नांदेडमधील पूरस्थिती तिसऱ्या दिवशी कायम, पिकांचे प्रचंड नुकसान; जायकवाडी, माजलगाव, येलदरी, लोअर दुधनातून विसर्ग सुरूच

परभणी / नांदेड8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड येथील शांतीधाम या गोदावरी नदीकाठावरील स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढा घातला, शेतीचे नुकसान - Divya Marathi
नांदेड येथील शांतीधाम या गोदावरी नदीकाठावरील स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढा घातला, शेतीचे नुकसान

गेल्या चार दिवसांपासून नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. पैठण येथील जायकवाडी, नांदेडचे विष्णुपुरी, जिंतूरचे येलदरी, सेलूतील लोअर दुधना आदी धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने त्या त्या प्रकल्पाच्या क्षेत्रातील नद्या दुधडी भरून वाहत आहेत. यामुळे शेतशिवारांत माेठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिकांची नासाडी झाली आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना महापूर आला असून पुराने रस्ते वाहतुकीसह काही गावांचा संपर्कही काही काळापुरता तुटला आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा तर रविवारी (दि.२०) सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती.

परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, पूर्णा, दुधना यासह अन्य काही नद्यांना पूर आला. सखल भागातील पूल जलमय झाले होते. सेलू तालुक्यातील कुपटा, पालम तालुक्यातील काही गावांचा काही काळापुरता संपर्क तुटला होता. परभणी ते कोल्हा दरम्यान ताडबोरगावजवळील अरूंद पुलावरून पाणी वाहत होते. पर्यायी रस्ताही चिखलमय झाला. त्यामुळे काही तास वाहतूक ठप्प होती.

गोदावरीचे पात्र फुगले :

जायकवाडी पाठोपाठ माजलगाव प्रकल्पातूनही गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. गोदावरीवरील तारूगव्हाण, ढालेगाव, मुद्गल, मुळी व डिग्रस बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. गोदावरीचे पाणी गंगाखेडात नृसिंह मंदिराच्या शिखरापर्यंत पाणी पोचले होते. गोदावरीला पूर आल्याने नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पातून मोठा विसर्ग केला जात आहे.

नुकसान भरपाई देण्याची मागणी

हिमायतनगर, हदगाव तालुक्यात संततधार पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी एकमुखी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. याची दाखल घेऊन हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हातभार द्यावा, अशी विनंती केली. हदगाव, हिमायतनगर तालुक्यात १६ ते १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीला झालेल्या पावसाने सोयाबीनच्या पिकात पाणी साचून शेती चिभडून गेल्या. सर्वच पिके धोक्यात आली. इसापूर धरणाचे पाणी कॅनॉल व नदीमध्ये सोडण्यात आल्याने शेतीमध्ये पाणी साचले आहे.

लोअर दुधनाची दारे उघडली :

रविवारी सकाळी सहाच्या सुमारास लोअर दुधना सिंचन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून दुधना नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दुधनेचे पात्र आधीच दुथडी भरून वाहत होते. त्यातच दुधनेचे पाणी आल्याने पाणीपातळीत मोठी वाढ झाली. येलदरीचेही रविवारी सर्व दरवाजे उघडून पूर्णा नदीत पाणी सोडल्यानेे पूर्णा नदीलाही पूर आला आहे. रहाटी बंधारा पूर्ण पाण्याखली गेला होता. सोनपेठ तालुक्यातील वाण नदीसही पूर आला. कर्परा नदीही दुथडी भरून वाहत होती.

गाेदावरीचा पूर कायम

> गोदावरी नदीचा पूर कायम आहे. विष्णुपुरीचे रविवारी आणखी दाेन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पूर्वी ८ दरवाजे उघडले हाेते.

> गोदावरी, पैनगंगेसह मांजरा, मन्याड या सर्वच उपनद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे तीन दिवसांपासून जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली.

> जायकवाडी व अन्य प्रकल्पांतून पाणी सोडण्यात येत असल्याने जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम आहे.

> बळेगाव बंधाऱ्याचे १४, आमदुरा बंधाऱ्याचे १४ आणि बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे जायकवाडीतून येणारे सर्व पाणी तेलंगणात वाहून जात आहे.

बातम्या आणखी आहेत...