आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख ४० हजार कोटींची तरतूद केल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असलेले दानवे यांनी राज्याला १२ हजार कोटी रुपये मिळाल्याचे जाहीर केलेले आहे. गेल्या बजेटमध्ये ११ हजार कोटी मिळाले होते. काँग्रेसच्या काळात ११०० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली नसल्याचे दानवे यांनी सांगितले. एवढ्या निधीतून मराठवाड्यातील ५० वर्षांपासूनचे प्रलंबित महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरण, औरंगाबाद-नगर नवीन रेल्वेमार्ग, औरंगाबादेतील मालधक्का शहराबाहेर हलवणे यांसह दौलताबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव आणि जालना-जळगाव, जालना-खामगाव मार्गाला निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील मालधक्का शहराबाहेर हलवण्याचे आश्वासन यापूर्वी दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांनी दिले होते. वेळेची बचत होण्यासाठी पूर्णा, परभणी, लातूर रोड, परळी, मुदखेड आदी बायपासची कामे मंजूर व्हावीत. दक्षिण मध्य रेल्वेची जास्त गाड्या सोडण्याची अडचण दूर होईल, असे मत रेल्वेचे अभ्यासक स्वानंद साळुंके यांनी व्यक्त केले. दुहेरीकरणासाठी पाचशे कोटींची गरज असून अंब्रेला योजनेत त्याचा समावेश केला आहे. मालधक्का हलवल्यानंतर २२ डब्यांच्या रेल्वेची देखभाल-दुरुस्ती शक्य होईल. त्यासाठी केवळ २९ कोटी रुपये मंजूर असून काही कोटींची अतिरिक्त रक्कम लागेल.
वंदे भारत रेल्वे औरंगाबादलाही मिळावी : राजपूत
पाचशे वंदे भारत रेल्वे देशाला समर्पित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी घोषणा केली आहे. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी असून बुद्धिस्ट सर्किटमध्ये समावेश करण्यासाठी येथून वंदे भारत रेल्वे सोडावी. जनशताब्दी रेल्वेची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळी ६ वाजेची करावी. सारनाथ, बोधगया, सांची, भोपाळ आणि औरंगाबाद असा मार्ग विकसित केला जावा. यासाठी फार मोठ्या निधीची आवश्यकता नाही. योग्य व्यवस्थापन केल्यास ते शक्य अाहे, असे मत टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.