आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंडाबळी:प्राध्यापिका तीन दिवसांपूर्वीच आईला म्हणाली, पतीकडून सतत पैशांची मागणी हाेत असल्याने आता मरणाशिवाय पर्यायच नाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या वर्षा दीपक नागलोत (२९) यांनी सासरच्या जाचाला, सततच्या पैशांच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. वडिलांनी सासरच्यांना १२ लाख ६० हजार रुपये देऊनही पैशांचा तगादा, नणंदेचा त्रास थांबत नव्हता. रविवारी वैजापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी संजरपूरवाडी येथे त्यांच्या आठ वर्षांच्या मुलावर गर्भवती आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे, नातेवाईक फरार झाल्याचे पोलिस सांगत असतानाच त्याच सासरच्यांनी त्याला नातेवाइकांमार्फत गावाकडे पाठवले व परतदेखील घेऊन गेले. तरीही पुंडलिकनगर पोलिसांना चोवीस तास उलटूनही तीन आरोपींना अटक करता आली नाही. दरम्यान, वर्षाने तीन दिवसांपूर्वीच आईला फाेन करून पतीकडून सतत पैशांची मागणी हाेत असल्याने आता मरणाशिवाय पर्याय नाही, असे सांगितले हाेते.

वर्षा यांच्या आत्महत्येप्रकरणी पती दीपक (३२), सासरा राजाराम महाजन नागलोत (६०), देविका राजाराम नागलोत (५५), नणंद वैशाली निखिल जारवाल (२५, सर्व रा. गजानन कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पती दीपक व सासरा राजाराम स्वत:हून ठाण्यात हजर झाले. नंतर राजाराम ठाण्यातून पसार झाल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. एखाद्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांसमाेरून ताे गायब कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करत संतप्त नातेवाइकांनी पोलिस ठाण्याच्या पायरीवर तासभर ठिय्या दिला. सासरा पसार कसा झाला, याचे उत्तर त्यांना मिळालेच नाही. अखेर सात वाजता नातेवाइकांनी घाटीतून वर्षा यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

वर्षा यांचे शेवटचे बोलणे पतीसोबतच : उपनिरीक्षक आनंद बनसाेड यांनी दीपकला न्यायालयात हजर केले असता ८ फेब्रुवारीपर्यंत कोठडी मिळाली. शुक्रवारी महाविद्यालयातून परतल्यानंतर वर्षा यांचे पतीसोबत कॉलवर बोलणे झाले. त्यानंतरच त्यांनी आत्महत्या केली. जप्त माेबाइलचा पासवर्ड माहिती नसल्याचे दीपकने सांगितल्याने पोलिसांना तपासणी करता आली नाही. परंतु दीपकचे विवाहबाह्य संबंध होते, असे वर्षा यांनी माहेरच्यांना सांगितले होते. त्याला त्याच्या आई-वडिलांचा पाठिंबा होता. त्या मुलीवर पैसे उडवण्यासाठी दीपक वर्षा यांना वडिलांकडून पैसे घेऊन ये असे म्हणायचा. तीन दिवसांपूर्वीच वर्षा यांनी आईला कॉल केला होता. पैशांची मागणी पूर्ण झाली नाही तर मला मरण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले होते.

पुंडलिकनगर पोलिसांच्या भूमिकेवर वर्षाच्या कुटुंबाचे प्रश्नचिन्ह वर्षा यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार झाले. नंतर सासरच्या मंडळींनी नातवासह पोबारा केला. त्यामुळे ते रविवार रात्रीपर्यंत सापडले नाहीत, असा दावा पुंडलिकनगर पोलिसांनी केला. मात्र, अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या ताब्यातील नातू दुसऱ्या नातेवाइकांमार्फत गावाकडे पाठवला. आठ वर्षांच्या चिमुकल्याने आईवर अंत्यसंस्कार केल्याचे पाहून त्यांचे वडील, भावांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हळहळले. अंत्यसंस्कारानंतर नातवाला घेऊन आलेले नातेवाईक परत गेले. त्यामुळे तो नक्कीच वर्षा यांच्या सासरच्यांच्या ताब्यात असणार. तरीही पुंडलिकनगर पोलिसांना रविवारी रात्रीपर्यंत आराेपी सापडले नाहीत. यामुळे पुंडलिकनगर पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बातम्या आणखी आहेत...