आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय इथले संपत नाही..:औट्रम घाटात दुर्गंधीचे साम्राज्य; दरडी कोसळण्याचा धोका कायम, अनेक ठिकाणी मोठ्या शिळा पडण्याच्या स्थितीत

औट्रम घाट, कन्नड11 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
कन्नड येथे मदतकार्य जाेमात सुरू आहे. छाया : रवी खंडाळकर. - Divya Marathi
कन्नड येथे मदतकार्य जाेमात सुरू आहे. छाया : रवी खंडाळकर.

औट्रम घाटात दरड कोसळल्यानंतर मातीचे ढिगारे आणि विशालकाय दगड बाजूला केल्यावर काही प्रमाणात वाहतूक खुली करण्यात आली. मात्र, ढगफुटीमुळे अनेक दगड डोंगराहून सरकण्याच्या स्थितीत असल्याने मोठ्या अपघाताची भीती नागरिकांना सतावत आहे. घटनेच्या ७० तासांनंतर ३ सप्टेंबरला चेंदामेंदा झालेला अपघातग्रस्त ट्रक दरीतून वर काढण्यात आला. यातील जनावरे सडल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

औरंगाबाद-धुळे महामार्ग क्रमांक २११ वर कन्नडच्या घाटात ३१ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते ४ दरम्यान ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे तीन ठिकाणी दरड कोसळली. पैकी एका दरडीमुळे वाहतूक ठप्प झाली. “दिव्य मराठी’ प्रतिनिधीने परिसराची पाहणी केली तेव्हा अजूनही या भागात मदतकार्य सुरू असल्याचे दिसले. ढगफुटीमुळे डोंगरात अनेक ठिकाणी माती आणि झाडे वाहून गेल्याने विशालकाय दगड खिळखिळे झाले आहेत.

दरड कोसळली त्या ठिकाणी त्याच आकाराचा एक विशालकाय दगड काेसळण्याच्या मार्गावर असल्याचे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या चाळीसगावच्या संत सत्रामदास इन्फ्रास्टक्चरचे संचालक राज पुंशी यांनी दाखवून म्हणाले तो वेळेत पाडणे गरजेचे आहे. पुंशी यांनी ७ जेसीबी आणि २ क्रेन लावून शुक्रवारी सकाळपर्यंत रस्ता साफ केला. घाटात किमान ७-८ ठिकाणी असा धोका आहे. हे धोके दूर केल्याशिवाय घाटात वाहन चालवणे जिवावर बेतू शकते, असे चाळीसगावच्या बोधरे तांंड्याचे बन्सी राठोड म्हणाले.

किमान दीड महिना काम : घाटात चार ठिकाणी खचलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी खालून काँक्रीट करून कठडे बांधावे लागतील. या कामात १५ दिवसांचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले आहे. मात्र, काम मोठे असल्याने ते किमान दीड महिना चालेल.

घाटावर तयार करण्यात आलेले वन खात्याचे पाणवठे आणि धरणांमुळे दरड कोसळल्याचा आमचा अंदाज आहे. यातील काही पाणवठे फुटल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अजून ठोस असे काही सांगता येणार नाही. - मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव.

ट्रकचा चेंदामेंदा : ९ म्हशी व ३ गायींना घेऊन जाणारा आयशर ट्रक कठडे तोडून दरीत कोसळला. शुक्रवारी दुपारी चेंदामेंदा झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने वर काढला. ट्रकचे केबिन व लोडिंगच्या भागाचे दोन तुकडे झाले होते. चालकाचे धड व मुंडके वेगळे झाले . जनावरे सडून दुर्गंधी पसरल्याने उभे राहणेही शक्य नसताना राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी बचावकार्यात लागले हाेते.

नळासारख्या धारा कोसळल्या
१२६० लोकसंख्येच्या भांबरवाडीचे शेतकरी नामदेव कोळी म्हणाले, दोन तास नळाच्या पाण्यासारख्या धारा कोसळत होत्या. पहिल्यांदाच घराच्या ओट्यापर्यंत पाणी आले. आमचा जीव वाचला. भविष्यात आमची गावेही खचण्याची भीती लंगडा तांडा, टिकाराम तांडा, सातकुंड, आंबाडा, आंबा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

जाळ्या बसवाव्यात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसहित घाटात डोंगराला लोखंडी जाळ्या बसवतात. यामुळे दरड थेट रस्त्यावर कोसळत नाही. येथेही अशा जाळ्या बसवायला हव्यात. - राज पुंशी, संचालक, संत सत्रामदास इन्फ्रा. प्रा. लि., चाळीसगाव

ढगफुटीचाच परिणाम
ढगफुटीसदृश पावसाशिवाय दरड कोसळण्यासाठी अन्य कोणतेही कारण दिसत नाही. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी डोंगरात लोखंडी जाळी बसवण्याची गरज पडल्यास वन विभागाची परवानगी लागेल. - महेश पाटील, प्रबंधक (तांत्रिक), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

पंचनामे फक्त पिकांचेच
घाटाखालील शिवापूरचे शेतकरी रोहिदास तूळ राठोड यांच्या ७ एकर शेतात ३ एकरांवर कांदे, ३ एकरांवर बाजरी पेरली होती. घाटातून एवढ्या वेगात पाणी आले की शेतातील बाजरी आडवी झाली. कांदे वाहून गेले. मोटार कामातून गेली. मंदिराचा पाया वाहून गेला. पाण्यासोबत आलेली वाळू शेतात पसरली. आता वाळू साफ करून मगच शेती करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...