आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळालेल्या मृतदेहाचे कोडे उलगडले:औरंगाबादेत भावाच्या मदतीने बायकोनेच दारुड्या नवऱ्याला संपवले

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सुधाकर चिकटे असे मृताचे नाव आहे. - Divya Marathi
सुधाकर चिकटे असे मृताचे नाव आहे.

दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच भावाच्या मदतीने पतीची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह हिमायतबागेपासून जवळच असलेल्या निर्जनस्थळी जाळल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. ज्या मोपेडवरून मृतदेह निर्जनस्थळी नेण्यात आला त्या वाहनाच्या पुराव्यावरून या गुन्ह्याची उकल गुन्हे शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी आरोपी पत्नी, तिचा भाऊ, भावजयी व भावाचा मुलगा अशा चौघांना पोलिसांनी अटक केली.

सुधाकर नारायण चिकटे (४३ रा. सांगळे कॉलनी, मूळ रा. सिंदखेडा मातला, ता. चिखली, जि.बुलडाणा) असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी आशा (४०), मेहुणा राजेश संतोष मोळवडे (४७), राजेशची बायको अलका आणि मुलगा युवराज राजेश मोळवडे (१९) (तिघे रा. गोधरी, ता. चिखली) अशी चार आरोपींची नावे आहेत.

आरोपी पत्नी, तिचा भाऊ, भावजयी व भावाचा मुलगा अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पोलिसांना जळालेला मृतदेह आढळला होता.
आरोपी पत्नी, तिचा भाऊ, भावजयी व भावाचा मुलगा अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पोलिसांना जळालेला मृतदेह आढळला होता.

पूर्वी ट्रॅव्हल्सवर चालक असलेला सुधाकर गेल्या सात महिन्यांपासून बेरोजगार होता. हिमायतबाग येथील सांगळे कॉलनी येथे त्याचे दुमजली घर आहे. खाली किराणा दुकान आणि पिठाच्या गिरणीसह रूम आहेत. ही दोन्ही दुकाने सुधाकरची पत्नी आशा चालवते. सहा-सात महिन्यांपासून आशाचा भाऊ व त्याचे कुटुंबीयही याच घरात वरच्या मजल्यावर राहत होते. सुधाकरला दोन मुली व एक मुलगा. मोठ्या मुलीचे लग्न १५ दिवसांपूर्वीच (२२ मे) रोजी झाले.

सुधाकरला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो सकाळपासूनच दारू प्यायचा तसेच पत्नीला व मुलाला मारहाण करायचा. याचाच राग आल्याने पत्नी आशाने तिच्या भावाच्या मदतीने सुधाकरची हत्या केली. मात्र घटनेनंतर २४ तासांच्या आत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अजित दगडखैर, अमोल म्हस्के, उपनिरीक्षक कल्याण शेळके, हवालदार विजय निकम, राजेंद्र साळुंके, संजय गावंडे आणि संदीप सानप यांनी आरोपींना अटक केली.

मेहुण्याचा रॉडने हल्ला

दारुड्या नवऱ्याच्या मारहाणीला आशा कंटाळली होती. भाऊ राजेशच्या मदतीने तिने लोखंडी रॉड आणून ठेवला. ४ जूनच्या रात्री जेवणासाठी सुधाकर सोफ्यावर बसला होता. त्याने पुन्हा आशाला त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच लग्न झालेली मुलगी घरी आल्यावर नवऱ्याकडे कशी परत जाते हे पाहतोच असे धमकावले. याचदरम्यान राजेशने पाठीमागून सुधाकरच्या डोक्यात जोरात हल्ला केला. या हल्ल्यात सुधाकर जागीच ठार झाला. आवाज झाल्याने राजेशची पत्नी अलका व मुलगा युवराज दोघेही खाली आले. त्यांनी मृत सुधाकरला पाहिले. या सर्वांनी मिळून सुधाकरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. अलकाने किराणा दुकानातून गोणी आणली. त्यात मृतदेह बांधून ठेवला. यानंतर राजेशने मोपेड पेट्रोल पंपावर नेली, ५०० रुपयांचे पेट्रोल भरून घरी आला. राजेश आणि युवराज हे दोघे मोपेडवरून मृतदेह हिमायतबाग परिसरातील निर्जनस्थळी घेऊन गेले. तेथे मोपेडमधील पेट्रोल नळीच्या साहाय्याने काढून सुधाकरचा मृतदेह जाळला आणि दोघेही परत घरी आले. तोपर्यंत अलका आणि आशा या दोघींनी घरातील रक्ताची साफसफाई केली. नंतर पोलिसांत जाऊन सुधाकर हरवल्याची तक्रार देण्याचाही त्यांचा प्लॅन होता.

दारूसाठी पैशाच्या तगाद्यामुळे वैतागली होती पत्नी

शनिवारी (४ जून) रोजी सकाळपासूनच सुधाकर दारू पिलेला होता. दुपारी त्याने आशाला दोनदा मारहाण केली. संध्याकाळी त्याला अजून दारू हवी होती. त्याला घराबाहेर पाठवण्यासाठी आशा रिक्षा आणण्यास गेली. मात्र तिला रिक्षा मिळाली नाही. त्यामुळे सुधाकर घरापासून जवळच मोकळ्या मैदानात दारू पिण्यासाठी गेला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो पुन्हा घरी आला. पत्नीकडे दारूसाठी पैसे मागू लागला. १५ दिवसांपूर्वी लग्न झालेली मुलगी घरी येणार होती, त्यामुळे अधिक वाद नको म्हणून आशाने त्याला पैसे दिले. तरीही सुधाकर वाद घालतच होता. काही वेळाने आशाचा भाऊ राजेश कामावरून आला. त्याने सुधाकरला समजावण्याचा प्रयत्न करत बाहेर नेले. दोघे सोबत दारू प्यायले. मात्र रात्री घरी आल्यावर पुन्हा सुधाकरने आशाला मारहाण केली.

सीसीटीव्हीत दिसलेल्या मोपेडवरून झाला उलगडा...

रविवारी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना हिमायतबाग परिसरात आढळला होता. पण त्याची ओळख पटत नव्हती. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पांढऱ्या रंगाची मोपेड पोलिसांना दिसली. सोमवारी सकाळी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी पथकाला हत्या झालेल्या परिसराजवळील वसाहतींतीत तपासासाठी पाठवले. सांगळे कॉलनी भागात पथक गेल्यावर पांढऱ्या रंगाची मोपेड पोलिसांना आढळून आली. तिथे पोलिसांना संशय आहे. त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता सुधाकर बेपत्ता असल्याचे कळले. मग पोलिसांनी आशा व इतरांकडे चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सुधाकरच्या १५ वर्षीय मुलाला उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मामानेच वडिलांची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी राजेशला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सर्व प्रकार कथन केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.