आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटक:शूलिभंजनचा रस्ता खड्ड्यात, 6 किमीच्या प्रवासासाठी लागताेय एक तासाचा वेळ

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबादजवळील दत्ताचे आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून शूलिभंजनची ओळख आहे. त्यामुळे औरंगाबादसह आसपासच्या जिल्ह्यातील भाविक, पर्यटक येथे येतात. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी बांधलेला शूलिभंजनचा रस्ता पूर्ण उखडून गेला आहे. मे महिन्यात तत्कालीन मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उद्घाटन झाले. मात्र, काम अजूनही सुरू झाले नाही. यामुळे पर्यटकांची संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी घटली आहे.

शूलिभंजनचे निसर्गसौंदर्य प्रत्येकालाच भुरळ घालणारे आहे. उंच डाेंगर, वळणाचा रस्ता, आजूबाजूला झाडी पाहून पर्यटकांची पावले हमखास इकडे वळतात. मुख्य रस्त्यापासून शूलिभंजन सहा किमी अंतरावर आहे. याबाबत सरपंच सय्यद इलियास सय्यद युनूस म्हणाले, रस्ता अतिशय खराब झाला आहे. मी गेल्या चार वर्षांपासून ताे दुरुस्त करावा म्हणून पाठपुरावा करत आहे. खड्ड्यांमुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. आम्ही आमदार अंबादास दानवे, खासदार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे पाठपुरावा केला. गेल्या १७ मे रोजी अदिती तटकरे आणि आ. सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत एक काेटी रुपये मंजूर करून रस्त्याचे उद्घाटन झाले. मात्र, काम काही सुरू झाले नाही. रस्ता चांगला झाला तर शूलिभंजनला भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल. मंदिराचे पुजारी मोहन गजबारे म्हणाले, रस्त्याची खूपच दुर्दशा झाली आहे. त्यामुळे मंदिरात येणारे भाविक कमी झाले आहेत.

जि.प. कडून १ काेटी, दानवेंनी मंजूर केला ५ काेटींचा निधी
२९ मार्च २०२२ रोजी पर्यटन विभागाने एक कोटी रुपये मंजूर केले हाेते, अशी माहिती पर्यटन विभागाचे श्रीमंत हरकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे काम हाेणार हाेते. आ. सतीश चव्हाण यांनी हा निधी मंजूर करून आणला होता. आमदार तथा शूलिभंजन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबादास दानवे यांनी पाच कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, त्याला नव्या सरकारने स्थगिती दिली. पुन्हा हा निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे दानवे म्हणाले.

जि. प. स्तरावर काम ठप्प
सरकारकडून एक कोटीचा निधी मंजूर करून आणला. अद्याप वर्क आॅर्डर निघाली नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे फाइल असल्याची माहिती आहे. मी याचा पाठपुरावा करेन.
- सतीश चव्हाण, आमदार

तातडीने दुरुस्ती करावी
आम्ही दोन दशकापूर्वी येथे नेहमी यायचो. त्या वेळी रस्ता चांगला होता. आता खूप खराब झाला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यास कारणीभूत आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी.
- डॉ. अभिलाषा मिश्रा, पर्यटक

बातम्या आणखी आहेत...