आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानातून भारतात परतलेल्या मूकबधिर गीताचे कुटुंबीय सापडल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आणि गीता अचानक पुन्हा चर्चेत आली. मात्र, या चुकीच्या वृत्तामुळे आधीच आई-वडिलांच्या प्रतीक्षेत असणारी गीता आणखी व्यथित झाली. मुंबईतील एका इंग्रजी वृत्तपत्राने गीता परभणीत राहत असल्याची एक बातमी दिली. त्यावर पीटीआय वृत्तसंस्थेच्या लाहोरमधील प्रतिनिधीने गीताला तिचे कुटुंब मिळाल्याचे वृत्त दिले. यात पाकमध्ये तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनच्या बिल्किस एधी यांनी गीताशी संवाद साधल्याचे सांगितले. पाकमधील द डॉनसह भारतातील काही माध्यमांनीही याबाबत वृत्त प्रकाशित केले.
मात्र, इंदूरमध्ये गीताचा सांभाळ केलेल्या आनंद सर्व्हिस सोसायटी संस्थेचे पदाधिकारी आणि सांकेतिक भाषातज्ज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांनी तिला कुटुंबीय सापडल्याचे वृत्त चुकीचे असून ती पाकिस्तानात कुणाशीच बोललेली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर संध्याकाळी वृत्तसंस्थांनी बातम्यांत सुधारणा केल्या. गीता ६ जानेवारीपासून परभणीत मूकबधिरांसाठी काम करणाऱ्या अनिकेत शेलगावकर यांच्या पहल फाउंडेशनमध्ये राहत आहे. जिंतूरच्या एका कुटुंबासोबत गीताचे धागेदोरे जुळत असले तरी डीएनए चाचणीनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे पुरोहित म्हणाले.
डीएनए चाचणी करावी : पुराेहित म्हणाले, वृत्तसंस्थेने गीता आणि कुटुंबीयांची डीएनए चाचणी करून ती जुळल्याचेही सांगितले. पण या चाचणीचा निर्णय मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्र सरकारच्या हातात नसून तो केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय घेईल. आजवर झालेल्या तिच्या सर्व डीएनए चाचण्या केंद्राच्या आदेशाने झाल्या. गीताचे डीएनए नमुने केंद्राकडे आहेत. पाकिस्तानच्या बातमीमुळे या प्रक्रियेला वेग येईल, असा विश्वास त्यांनी वर्तवला.
आठव्या वर्षी लाहोरला
वयाच्या ८ व्या वर्षी चुकून रेल्वेतून गीता लाहोरला गेली. तेथे १५ वर्षे राहिल्यावर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने ती भारतात आली. इंदूरच्या ज्ञानेंद्र पुरोहित यांनी संवाद साधल्यावर ती मराठवाडा-तेलंगण सीमेवर राहत असल्याचे संकेत मिळाले. नोव्हेंबर २०२० पासून या भागात तिच्या कुटुंबीयांच्या शोधासाठी मोहीम राबवली.
जिंतूरशी जुळल्या होत्या गीताच्या तारा
६ जानेवारीला गीता आपली मुलगी असल्याचा दावा जिंतूरच्या मीना वाघमारे-पांढरे यांनी केला. वाघमारे कुटुंबीय जिंतूरच्या तुळजाभवानी मंदिराबाहेर बेलफुले विकायचे. गीता बसमधून परभणी व तेथून सचखंड रेल्वेने अमृतसर व पुढे लाहोरला गेल्याचा त्यांचा दावा आहे. मीना सांगत असलेली जळाल्याची खूणही गीताच्या शरीरावर आहे. पतीच्या निधनानंतर मीना यांनी दिनकर पांढरे यांच्याशी विवाह केला. त्या वाळूज-पंढरपूर येथे राहतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.