आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन उन्हाळ्यात टंचाई:फारोळ्याजवळ जुनी जलवाहिनी फुटल्याने; शहराला आज पाणी मिळणार नाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

उन्हाळा सुरू होताच शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या कुठे सहा तर कुठे आठ, नऊ दिवसांनंतर पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाणी जपून वापरावे लागत आहे. त्यातच रविवारी (२० मार्च) फारोळा फाट्याजवळ शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जुनी जलवाहिनी फुटल्याने सोमवारी शहरातील कोणत्याच भागाला पाणी मिळणार नाही.

शहराला नवीन १४०० आणि जुन्या ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांनी पाणीपुरवठा केला जातो. या दोन्हीही वाहिन्यांचे आयुष्यमान संपलेले आहे. त्यामुळे पाइप वारंवार फुटतात. रविवारी दुपारी २ वाजता फारोळा ते नक्षत्रवाडी दरम्यान फारोळा फाटा येथील नाल्यातील ७०० मिमीची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. त्यामुळे फारोळा येथून शहराकडे येणारे पाणी बंद करण्यात आले. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले. वाहिनी फुटल्याने या परिसरात पाणी साचले होते. त्याचा उपसा करण्यासाठी तीन मोटार पंप लावण्यात आले. नंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले. हे काम रात्री उशीरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. यामुळे या वाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा काही तास बंद राहणार आहे. रात्री दुरुस्ती झाल्यानंतर शहरातील जलकुंभात पाणी आले तरी ते पूर्णपणे भरणार नाहीत. त्यामुळे सोमवार, मंगळवार शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे विस्कळीत राहतील.

टँकरने पाणी देणे अशक्य : उन्हाळ्यात बहुतांश बोअरवेल आटतात. त्यामुळे शहराच्या आजूबाजूला असलेल्या पडेगाव, मिसारवाडी, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, जटवाडा रोडसह अनेक भागांत मनपाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाते. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे या भागात देखील टँकरचे पाणी पुरवण्यास मनपाला अडचण येणार आहे.

पाणी उपसण्यासाठी अग्निशमनचे पंप
फुटलेली पाइपलाइन फारोळ्याजवळील नाल्यात आहे. त्यामुळे पाइपलाइन व नाल्याचे पाणी बंद करण्याचे आव्हान मनपा कर्मचाऱ्यांसमोर होते. अखेर पाणी उपसण्यासाठी मनपाला अग्निशमन विभागाचे पंप मागवावे लागले. ३० कर्मचारी रात्री उशिरापर्यंत पाणी उपसण्याचे काम करत होते. दुरुस्तीला वेळ लागणार असल्याने सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. जुन्या शहरासह सिडको-हडको परिसरात देखील पाणी येणार नाही, अशी माहिती धांडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...