आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मिटमिटा परिसरातील ६० एकर जागेवर उभ्या राहणाऱ्या सफारी पार्कचे काम पुढील दोन वर्षांत आता पूर्ण करण्याचे नियोजन मनपा व स्मार्ट सिटीने केले आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पार्कचे काम ४ टप्प्यांत होणार आहे. यासंदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, शहर अभियंता सखाराम पानझडे, सल्लागार ब्रिजराज शर्मा, डॉ. के. एम. सोनी, रोमल मेहता, पी. आर. मेहता, प्रेम बालानी, समीर जोशी, स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान उपस्थित होते.
टप्पा पहिला : शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता करून देणार पहिल्या टप्प्यात सफारी पार्कच्या ४.२५ किमीच्या ३ संरक्षक भिंती, लेव्हलिंग आणि पाच गेटचा समावेश आहे. यातील दोन बाजूंच्या संरक्षक भिंती तयार केल्या आहेत. या प्रकल्प परिसरातील आजूबाजूचे शेतकरी सफारी पार्कमधील रस्त्याचा वापर करतात. या शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर तिसरी संरक्षक भिंत बांधणार आहे. याबरोबरच सफारी पार्कसाठी मुख्य प्रवेशद्वार, सर्व्हिस गेट, हाय-वे गेट, पार्किंग गेट आणि इमर्जन्सीसाठी एक गेट असे पाच गेट करण्यात येणार आहेत. यातील एक गेट तयार केला आहे. तसेच, सफारी पार्कच्या लेव्हलिंगचे कामही आता पूर्ण झाले आहे.
दुसरा टप्पा : कंपोस्टिंग तयार करणार दुसऱ्या टप्प्यांतर्गत रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. यात मुख्य आणि सर्व्हिस राेडचा सामावेश आहे. याबरोबरच पाणी, ड्रेनेज, विजेंतर्गत वितरण व्यवस्था व व्यवस्थापन सुरू आहे. याबरोबरच या टप्प्यांत कचरा व्यवस्थापनाचा सामावेश आहे. ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सफारी पार्कमध्ये कंपोस्टिंग करणार आहे.
तिसरा टप्पा : ८४ घरे बांधणार तिसऱ्या टप्प्यात प्राण्यांसाठी ८४ घरे बांधणार आहे. विविध प्रजातींच्या प्राण्यांसाठी त्यांच्या वैशिष्ट्याप्रमाणे घरांची डिझाइन बनवली आहे. सफारी पार्कमधील प्रशासनासाठी इमारत, स्टोअर रूम, फूड कोर्ट, विविध विभागांसाठी इमारत, टॉयलेट्स, स्मरणिका दुकान बांधणार आहे. त्यासाठी निविदा मंजूर झाल्यानंतर काँट्रॅक्टर नेमले व त्यांचे काम सुरू आहे.
चौथा टप्पा : शवदाहिनी बसवणार सफारी पार्कच्या चौथ्या टप्प्यात जागेच्या उपलब्धतेनुसार कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर, टायगर सफारी करणार आहे. येथे दिशादर्शक व माहिती सांगणारे फलक लावणार आहे. याबरोबरच प्राणी मृत झाल्यानंतर त्यांचा आजार पसरू नये, यासाठी शवदाहिनी बसवणार आहे. हे दोन टप्पे २०२३ च्या शेवटी पूर्ण होतील. मार्च २०२४ पर्यंत सफारी पार्क कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती सल्लागार ब्रिजराज शर्मा यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.