आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाचे नॅरोगेज:तेच प्रश्न, तीच उत्तरे; बैठक फक्त नांदेडऐवजी औरंगाबाद शहरात!

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून दरवर्षी मराठवाड्यातील खासदारांची एक बैठक नांदेडमध्ये होते. त्यातून काहीही ठोस निष्पन्न होत नाही. आता रेल्वे राज्यमंत्रिपदच मराठवाड्याकडे असल्याने २० ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे घडेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तेच प्रश्न, रेल्वे अधिकाऱ्यांची तीच नकारात्मक उत्तरे, असे चित्र दिसले. फक्त बैठक नांदेडऐवजी औरंगाबादमध्ये आणि अधिकाऱ्यांऐवजी दानवेंच्या अध्यक्षतेखाली एवढाच काय तो फरक होता.

रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, मराठवाड्याचा दक्षिण मध्यकडून मध्य रेल्वेत समावेश करा, ही १९९०च्या दशकात स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी लावून धरलेली मागणी बुधवारच्या बैठकीत कायम होती. याशिवाय औरंगाबाद, चाळीसगाव, खामगाव, कोपरगाव रोटेगाव आदी शहरांविषयीच्या मागण्याही पुन्हा झाल्या. त्यावर तीच बघतो, करतो, अभ्यास करतो अशी आश्वासने मिळाली. चार महत्त्वाच्या जिल्ह्यांचे खासदार फिरकलेही नाहीत.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस खासदार संजय जाधव, खासदार इम्तियाज जलील, खासदार फौजिया खान यांची उपस्थिती होती. आतापर्यंत नांदेडमध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांची बैठक होत होती. बुधवारी जालन्याचे खासदारच रेल्वे राज्यमंत्री असल्याने त्यांच्या अध्यक्षतेत दीड तास बैठक झाली.

कासवाला लाजवेल अशा गतीने विद्युतीकरण : खासदार जाधव, फौजिया खान आणि इम्तियाज जलील यांनी नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेऐेवजी मध्य रेल्वेशी जोडला तरच मराठवाड्याचा विकास होईल असे सांगितले. त्यासाठी त्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाची आकडेवारी सादर केली. आंध्र, तेलंगणात दोन वर्षांत ४००० किलोमीटर विद्युतीकरण झाले आहे, तर नांदेड विभागाने अकोला - लोहगाव असे केवळ ३५ किमीचे काम केले. एवढा अन्याय आमच्यावर होत असेल तर या विभागात राहायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्याला दानवेंच्या रूपाने पहिला रेल्वेमंत्री मिळाला आहे. त्यांनी नांदेड विभाग मध्य रेल्वेत आणला तर ती खऱ्या अर्थाने गोविंदभाईंना श्रद्धांजली ठरेल. जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदराबाद विभागात ११८९, विजयवाडा ९२५, गुंतकल ११५२, गुंटूर ६२९, हैदराबाद ८१ असे विद्युतीकरण झाले आहे. त्यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी नांदेड विभाग महसुलीदृष्ट्या फायद्यात नसल्याने काम होत नसल्याचे सांगितले. इम्तियाज यांनी आक्षेप घेत मराठवाडा मागास असल्याने प्रत्येक वेळेस नफ्यातोट्याची गणिते पाहिली तर विकास कधीच होणार नाही, असा मुद्दा मांडला.

अच्छे दिन माझ्यासाठी आले
इम्तियाज यांनी भाजपचा ‘अच्छे दिन आयेगे’ असा नारा होता, असे निदर्शनास आणून दिले. तेव्हा दानवे म्हणाले की, माझे तर अच्छे दिन आले आहेत. मग इम्तियाज यांनी तुमचे आणि डॉ. कराडांचे अच्छे दिन आले आहेत. लोकांचे कधी येणार? असा प्रश्न केला. खासदार जाधव यांनी मराठवाड्याच्या जनतेचे अच्छे दिन येऊ द्या. लोकांचे रेल्वे प्रश्न सोडवा. तरच अच्छे दिन येतील अशी टिप्पणी केली.

२०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण : सिंग यांना उद्देशून दानवे म्हणाले की, २०२३ पर्यंत आपल्याला नांदेड विभागाचे विद्युतीकरण पूर्ण करायचे आहे. कुठलीही तांत्रिक समस्या आली नाही तर वेळेत काम पूर्ण होईल.

उत्तरांमुळे औपचारिक बैठक
बैठकीनंतर खासदार खान, इम्तियाज म्हणाले की, रेल्वे राज्यमंत्र्यांची उत्तरे ऐकल्यावर ही बैठक म्हणजे केवळ औपचारिकताच असल्याचे वाटते. दरवेळी तेच प्रश्न आम्ही मांडतो. त्याची ठरावीक उत्तरे मिळतात. बुधवारी साक्षात मंत्रिमहोदय असूनही तोच अनुभव आला.

खासदारांची अनास्था कायम
ही बैठक दानवेंनी नांदेडवरून औरंगाबादला आणली खरी, मात्र आपल्या विभागाचे प्रश्न मांडण्याची खासदारांची अनास्था येथेही पाहायला मिळाली. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशीमच्या भावना गवळी, अकोल्याचे संजय धोत्रे अनुपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...