आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेचा पहिला दिवस:कोरोनाच्या धास्तीने ज्ञानमंदिरे सुनी-सुनी; औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीडमध्ये विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षिततेची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश

मागील सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाचे सावट असताना सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीनंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. दिवाळीनंतर मंदिरे उघडी करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. पण कोरोनाच्या धास्तीने उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती दिसून आली. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय महिनाभर लांबणीवर पडला आहे.

उस्मानाबाद : ऐंशी हजारपैकी ११ हजार विद्यार्थ्यांची हजेरी

शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची संमती आवश्यक असल्याने व शिक्षक कोरेाना पॉझिटिव्ह आढळत असल्याने विद्यार्थ्यांचा शाळेला प्रतिसाद कमी मिळाला. ४९१ पैकी ४४५ शाळा उघडल्या. मात्र, ८० हजार २९२ पैकी ११ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली. शासनाने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काेरोना तपासणी करण्यात आली.

या तपासणीत ४,९०२ पैकी ८३ शिक्षक व कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी ८० हजार, २९२ विद्यार्थ्यांचा पट आहे. मात्र, ११ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. निवासी तसेच आश्रमशाळा सुरू न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना असल्याने ४६ शाळा सोमवारी उघडू शकल्या नाहीत.

जालना : जिल्ह्यातील ५३६ पैकी, ४०९ शाळा झाल्या सुरू

जालना | सोमवारी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेळो वेळी पाठपुरावा करण्यात आला. खोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांची कोरोना चाचणीसाठी थर्मल गण तसेच शाळेत हात धुण्याची सोय करणे आदी कामे आठवडाभरापासून सुरू होते. सोमवारी प्रत्यक्षात ५३६ विद्यालयांपैकी ४०९ ठिकाणी विद्यार्थी दाखल झाले. जालना जिल्ह्यात एकूण ५३६ शाळांतील ३ हजार ७६६ शिक्षक तर १२१८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणीचे करण्यात आली. यातून प्राप्त झालेल्या अहवालांपैकी ५६ जणांचा कोवीड अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे ज्या शाळांतील शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्या शाळा बंद किंवा संबधित शिक्षकांना शाळेवर जाण्याचे थांबवण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी शोभा गरूड यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बीड : सुरक्षिततेची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश

बीड | जिल्ह्यात आठ महिन्यांनंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली. कोरोनाच्या सावटाखालीच सर्व नियमावली पाळून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले. जिल्ह्यातील ७६८ शाळांपैकी २३६ शाळाच सुरू झाल्या. ज्या शाळा सुरू झाल्या तिथेही पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ शिक्षक कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ७६८ शाळा आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ५० टक्के उपस्थिती क्षमतेवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी शाळांचे निर्जंतुकीकरण, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक अंतर ठेवून बसवणे, त्यांची थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटरणे तपासणी करणे या बाबी पाळण्यात आल्या. तत्पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरेाना चाचणी बंधनकारक केली गेली होती. पहिल्या दिवशी ७८ हजार विद्यार्थ्यांपैकी अवघे अडीच हजार विद्यार्थी उपस्थित हाेते.

औरंगाबाद : संमतीपत्राअभावी जिल्ह्यात केवळ शिक्षकांची शाळा

औरंगाबाद | जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शाळांमध्ये संमतीपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. तर काही शाळांमध्ये तुरळक विद्यार्थी संख्या दिसून आली. यात प्रत्येक शाळेमध्ये मास्क आवश्यक, तसेच शाळेत थर्मल गन व सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर देण्यात आला. काही शाळांमध्ये तर केवळ शिक्षक दिसून आले. मुले शाळेकडे फिरकलेच नसल्याने शिक्षकांचीच शाळा भरल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील हजेरी पटावर केवळ ३ ते पाच टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. दरम्यान, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. पण पालक व विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकही जास्त इच्छुक दिसत नसल्याचे चित्र आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser