आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:‘पेट’ परीक्षेचा दुसरा पेपरही आता विद्यार्थ्यांना घरबसल्या देता येणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत सदस्यांनी शुक्रवारी (५ मार्च) आक्रमक पवित्रा घेत गदारोळ केला. त्यामुळे ‘पेट’चा दुसरा पेपर घरबसल्या देता येईल, असा निर्णय कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी जाहीर केला.

३० डिसेंबर २०२० रोजी विद्यापीठाने ‘पेट’संदर्भात अधिसूचना जारी केली. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून ‘पेट’ घरी बसून ऑनलाइन पद्धतीने पेपर घेण्याचे जाहीर केले. त्यानुसारच ३० जानेवारीला जनरल अॅप्टिट्यूड टेस्टचा पहिला पेपर झाला. मात्र, यात मासकॉपीच्या तक्रारी कुलगुरूंकडे आल्या. म्हणून त्यांनी दुसरा पेपर ऑनलाइनच पण परीक्षा केंद्रावर येऊन देण्याचा एकमेव पर्याय ठेवला होता.

मात्र, अर्थसंकल्पीय अधिसभा सुरू होताच प्रा. सुनील मगरे यांनी आवाज चढवत, ‘विषयपत्रिकेला सुरुवात करण्यापूर्वी ‘पेट’विषयी निर्णय घ्या’ असा आग्रह धरला. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलच्या सदस्यांना वाटले की, अभाविपच्या निवेदनामुळे कुलगुरूंनी हा निर्णय बदलला आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीत ‘पेट’चा दुसरा पेपरही आॅनलाइनच घेतला पाहिजे. आम्ही मनमानी खपवून घेणार नाही, असे प्रा. मगरे यांनी म्हटले. जहूर शेख म्हणाले, ‘यूजी-पीजीच्या परीक्षाही आॅनलाइन झाल्या. त्यातही मासकॉपी झाली असे तुम्हाला म्हणायचे आहे का?’ डॉ. भारत खैरनार म्हणाले, ‘आपण कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहाेत. मग, विद्यार्थ्यांना केंद्रावर बोलवण्याचा आग्रह का धरत आहात? प्रा. संभाजी भोसले, संजय काळबांडे, विजय सुबुकडे आणि प्रा. मगरे यांनी कुलगुरूंच्या समोर जमिनीवर ठाण मांडले. त्यांना संजय निंबाळकर, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. सतीश दांडगे डॉ. गोविंद काळे, रमेश भुतेकर आणि डॉ. नरेंद्र काळे यांनीही पाठिंबा दिला.

विद्यापीठ अर्थसंकल्पीय अधिसभा : आक्रमक रूप पाहून कुलगुरूंचा होकार
ग्रामीण भागातून सर्वाधिक तक्रारी; संशोधन गुणवत्तेवर आराेप नकाेत

कुलगुरू म्हणाले, ‘मी हा निर्णय गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी घेतला होता. कारण, त्यांच्या पालकांनी आमच्या मुलांकडे कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही, असल्याचे सांगितले होते. म्हणून मी परीक्षा केंद्रावरील आम्ही दिलेल्या संगणकावर परीक्षेचा पर्याय ठेवला होता. या परीक्षेला माझे कुणीही नातेवाईक बसलेले नाही. विद्यापीठाच्या संशोधन गुणवत्तेवर कुठलेही आरोप होऊ नये, असाच माझा प्रयत्न होता.

कुलगुरूंचे अभिनंदन
या बैठकीत काही सदस्य कुलगुरूं डाॅ. येवले यांच्याविरोधात रोष व्यक्त करत असताना वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांनी औषधनिर्माणशास्त्रात पेटंट मिळाल्याबद्दल कुलगुरूंचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडला. त्याला प्रा. भोसलेंनी अनुमोदन दिल्यावर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...