आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकै. नाट्यकर्मी लक्ष्मणराव देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त ४ डिसेंबर रोजी संत एकनाथ रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचा ४५० वा प्रयोग होतोय. यानिमित्त अभिनेता संदीप पाठक याने नाटकाविषयी केलेले अनुभव कथन त्याच्याच शब्दात...
‘वऱ्हाड’च्या प्रयोगाने १० वर्षांत गाठलेला हा टप्पा खूप मोलाचा आहे. प्रेम, प्रसिद्धी, पैसा आणि समाधान सर्वकाही या एकाच कलाकृतीने मला दिले. वऱ्हाडची शाल हलकी आहे, पण तिची जबाबदारी खूप जड आहे. देशपांडे सरांनी ‘वऱ्हाड’ला गावोगावी पोहोचवण्यासाठी अपार कष्ट घेतले. मी त्याची फळे चाखतो आहे. ज्या काळात त्यांनी याला सुरुवात केली, त्या काळात सोयीसुविधा वगैरे असा काही विषयच नव्हता. एसटीचे धक्के खात ते गावोगावी फिरले. परदेशापर्यंत प्रयोगाला घेऊन गेले. आजच्यासारखा सोशल मीडिया नव्हता. तरीही ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवलं हे विशेष. मी आज देश-परदेशात प्रयोग करतो, यात विलक्षण काहीच नाही.
माजलगावात राहत असतानाचे प्रसंग आजही जसेच्या तसे आठवतात. देशपांडे सर प्रयोगासाठी आले होते. मी सहावीला होतो. वडिलांसोबत त्यांना भेटायला गेलो. डायरीवर त्यांची सही घेतली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्वच काही वेगळेच होते. या प्रयोगात सर्वात मोठी तफावत म्हणजे ते एकदम देखणे आणि मी असा. तरीही त्यांचा प्रयोग करतो आहे, लोक त्याला पसंती देत आहेत, हे त्यांनी केलेलं काम आहे. वऱ्हाडची शाल काही साधीसोपी नाही. एक तर ती सर्वसामान्य शालींच्या लांबी-रुंदीची नाही. ती खास वऱ्हाडसाठी बनवून घेतलेली आहे. ही शाल प्रयोगातील प्रॉपर्टी नाहीये, तर ती एक व्यक्तिरेखा आहे. मी एकवेळ माझी कापडं विसरेन पण शाल विसरलो तर मी प्रयोगच करू शकत नाही. कारण, प्रत्येक संवाद, हावभाव तिच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. एकदा परदेशात प्रयोग केला अन् पुढचा प्रयोग मुंबईत होता. मी पोहोचलो, पण माझे लगेज पोहोचले नव्हते. माझ्यासह सर्वांनाच प्रचंड टेन्शन आले. खूप ओळखी आणि शर्थीचे प्रयत्न करून लगेज मिळवले. पण, तेव्हा अधिकाऱ्यांनी एक सल्ला दिला की, तुम्ही दोन शाली बनवून घ्या.
कारण, एक सामानात राहिली तर एक तुमच्या जवळच्या बॅगेत असायला हवी. प्रत्येकवेळी सगळे जमून येईलच अशी शाश्वती नसते. तेव्हापासून दोन शाली बाळगतो.बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या मान्यवरांसोबतच विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी प्रयोगाला प्रेम दिले. एखादा सिनेमा, मालिका देऊ शकणार नाही, अशी ओळख या प्रयोगाने मला दिली. १० वर्षांत ४५० वा प्रयोग होतो आहे. यामध्ये निर्माते संदीप सोनार यांची भूमिका माझ्यापेक्षाही महत्त्वाची आहे. वऱ्हाडने अनेकांना या क्षेत्रात आणले, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
पकडला जातो.. हीच पावती या एकपात्री नाटकात ५२ व्यक्तिरेखा आहेत. पण महिला पात्रांची धम्माल आहे. ‘वन्सं’ हे पात्र सुरू हाेताच टाळ्यांतून दाद मिळते. मी सरांची कलाकृती करतोय, पण, काळानुसार किंचित जागा बदलतो. ती वेळेची गरज आणि माझी मर्यादा आहे. पण, जेव्हा विंगेत चाहते येऊन म्हणतात, ‘तुम्ही अमुक संवाद घेतला नाही’, तेव्हा त्यांनी मला पकडलेलं असतं. पण याला मी पावती समजतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.