आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM शिंदेंच्या वॉररूमचे संचालक मोपलवार यांची मुलाखत:म्हणाले- 'समृद्धी'चा शिर्डी ते मुंबई टप्पा जुलै 2023पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“समृद्धी’च्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे ती शिर्डी - मुंबई या दुसऱ्या टप्प्याबद्दल. या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच मुख्यमंंत्र्यांच्या इन्फ्रा वॉररूमचे विद्यमान संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी संवाद साधला आहे “दिव्य मराठी’चे प्रतिनिधी अतुल पेठकर यांनी.

प्रश्न : पहिला टप्पा खुला होणार, दुसऱ्या टप्पा केव्हा ? मोपलवार : शिर्डी ते मुंबई हा दुसरा टप्पा एकूण १८० किमी आहे. त्याचेही ८० टक्के काम संपलेले आहे. हे काम ५ जून २०२२ मध्ये संपले असते. पण, कोरोनाच्या दोन वर्षांमुळे काम लांबणीवर पडले. आता जुलै २०२३ मध्ये काम संपवण्याचे आमचे लक्ष्य आहे. सहा बोगदे आणि त्यातील एक बोगदा तब्बल आठ किलोमीटरचा असे या टप्प्यावर मोठे आह्वान होते. देशातील सर्वाधिक रुंद असा साडेसात किलोमीटरचा बोगदा असा विक्रम यात केला गेला आहे.

प्रश्न : या बोगद्याचे काम किती झाले आहे? मोपलवार : जवळजवळ सर्वच. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून ठाणे जिल्ह्यातील वशाळापर्यंतचा बोगदा पूर्ण करण्याचे अत्यंत जोखमीचे आणि ऐतिहासिक काम आमच्या टीमने अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केले आहे. समृद्धी महामार्गावरील या चौदाव्या पॅकेजमध्ये घाटातील रस्ता, दरीतील पूल, पांथस्थांसाठीचे ओव्हरब्रिज, अंडर पास आणि एवढा मोठा बोगदा अशी अनेक आह्वाने होती तरीही जुलै २०२३ पर्यंत हा दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात हे कामही वायूवेगाने सुरू आहे.

प्रश्न : याचे काम आता कोणत्या टप्प्यात आहे? मोपलवार : डोंगरी भागातील काम हे मोठे आव्हान होते. कोणत्याही परिस्थितीत या पावसाळ्याच्या आत पूर्ण करायचा प्रयत्न आहे. पावसाचे पाणी बोगद्यात घुसू नये यासाठी बोगद्याच्या प्रवेशद्वारांवर खास छत तयार करण्यात आले. बोगद्यातील सीलिंग लायनिंग, फाअर कोटिंग सीलिंग, रस्ता, अग्निरोधक यंत्रणा, व्हेंटिलेशन, लायटिंग पूर्ण झाले आहे. सुरक्षेच्या कारणासाठी दर ३०० मीटरवर सुरक्षा द्वारे बांधण्यात आली आहेत. सुरक्षिततेचे आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करणारा हा देशातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिला बोगदा ठरणार आहे.

प्रश्न : यामुळे विदर्भाला मुंबई जोडली जाईलच, पण मराठवाड्यापर्यंत ही ‘समृद्धी’ पोहोचवणाऱ्या नांदेड - जालना विस्तारित महामार्गाचे काय? मोपलवार : जालना ते नांदेड या तिसऱ्या टप्प्यातील रस्त्यासाठीचे भूसंपादन मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर साधारणत: आॅक्टोबर २०२३ पर्यंत काम सुरू होणे अपेक्षित आहे. २ हजार हेक्टर शेतजमीन यासाठी लागणार आहे. यासाठीही समृद्धीच्या धर्तीवर मोबदला देण्यात येणार आहे. सहमती देणाऱ्यांना रेडी रेकनरच्या पाचपट आणि एरवी चारपट मोबदला देण्यात येणार आहे. हा तिसरा टप्पा पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणेच विक्रमी वेळेत पूर्ण होईल अशी आशा आहे.

प्राधान्याचे प्रकल्प -विरार-अलिबाग कॉरिडॉर, पुणे रिंग रोड आणि जालना - नांदेड एक्स्प्रेस पायाभूत सुविधा उभारण्याची प्रक्रिया वेगवान व्हावी यासाठी इन्फ्रा वॉररूममध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. यात विरार-अलिबाग कॉरिडॉर, पुणे रिंग रोड आणि जालना - नांदेड एक्स्प्रेस वे हे प्राधान्यावरील प्रकल्प आहेत. विरार-अलीबाग कॉरिडॉरसाठी मंत्रिमंडळाने ५५ हजार कोटींच्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. येथे १ हजार हेक्टर जमीन संपादन सुरू आहे. पुणे रिंग रोड प्रकल्प ३० हजार कोटींचा आहे. यासाठी २ हजार हेक्टर जमीन संपादन आहे.जालना - नांदेड एक्स्प्रेस वेसाठी २२ हजार कोटींची मंंजुरी आहे. यात २ हजार हेक्टरचे भूसंपादन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...