आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या मध्यवर्ती भागातील मोंढा बाजारपेठेत चार चोरट्यांनी एक तास धिंगाणा घातला. यात त्यांनी पाच दुकानांचे शटर फोडून हजारो रुपयांची रोख लंपास केली. मात्र, चोरीत ऐवज कमी हाती लागला म्हणून जाताना दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान करून गेल्याचे समोर आले. याप्रकरणी सिटी चौक, क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्योतीनगरातील सतीश दरगड यांची २६ वर्षापासून मोंढ्यातील झांबड हाइट्समध्ये साई गॅस एजन्सी आहे. त्यांच्यासह पत्नीदेखील एजन्सीचे काम पाहतात. दरगडसह कर्मचारी मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी एजन्सी बंद करून घरी गेले. मित्राच्या घरी कार्यक्रम असल्याने रात्री उशिरापर्यंत ते तेथेच होते. मात्र, बुधवारी सकाळी ६:३० वाजता त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे स्थानिकाने सांगितले. त्यानंतर दरगड यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दरगड यांच्या शेजारच्या महेंद्र झांबड यांच्या मोटारीचे गोडाऊनही चोरट्यांनी फोडले. त्यानंतर गोळ्या बिस्किटांचे होलसेल दीपक जनरल स्टोअर्सचे शटर उचकटवून आत प्रवेश केला. त्यापूर्वी चोरांनी जुन्या मोंढ्यात दोन दुकाने फोडत रोख रक्कम लंपास केली.
सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद, ४:२६ मिनिटांनी प्रवेश ही सर्व चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा प्रकार चौघांनी केला असून दोघे शटर उचकटवून एक जण आत प्रवेश करतो, तर इतर दोघे इतरांवर लक्ष ठेवतात. अवघ्या तीन मिनिटांत चोरट्यांनी दरगड यांच्या एजन्सीमधील सर्व ड्रॉवर फोडून त्यातील कागदपत्रे, साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठी रोख दरगड सोबत घेऊन गेल्याने चोरांच्या हाती १० ते १२ हजार रुपये लागले. झांबड यांच्या गोडाऊनमध्ये मोठा ऐवज हाती लागला नाही. गोळ्या बिस्किटांच्या दालनातून मात्र १५ ते २० हजारांचा ऐवज चाेरीला गेला. घटनेची माहिती कळताच सिटी चौक ठाण्याचे उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, क्रांती चौक पोलिस व गुन्ह शाखेने धाव घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.