आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण- दसरा मेळावा:‘माझ्यामुळे पक्ष नाही, पक्षामुळे मी आहे’ हा सूर पंकजांसाठी लाभदायक

नामदेव खेडकर | औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंकजा मुंडेंचा यंदाचा सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथील भगवान भक्तिगडावरील दसरा मेळावा अपेक्षेप्रमाणे दणक्यात झाला. कुठलेही ‘प्लॅनिंग’ नसताना गर्दी जमते ही त्यांची जमेची बाजू आजही कायम दिसली. या मेळाव्यातील संपूर्ण भाषणात पंकजा मुंडेंनी प्रदेश भाजपशी, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याची भावना अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. मात्र, वंजारी समाजात दिली जात असलेली पदे आणि ती पदे देण्यामागच्या उद्देशांवरून पंकजांनी काही सूचक विधानेही केली आहेत. यंदा प्रथमच पंकजांनी वाचून भाषण केले. लिहिलेल्या भाषणावरून नजर अन् मन इतरत्र जाऊ दिले नाही.

पंकजा मुंडेंना पक्ष सतत डावलतोय ही पंकजांच्या समर्थकांची भावना आहे. विधानसभेतील पराभवानंतर आमदारकी न दिल्याने समर्थकांनी यापूर्वी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘किंमत चुकवावी लागेल’ असा इशारा दिला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात जरा हातचे राखून, आवेशाला आवर घालूनच भाषण केले. अगदी विधान परिषदेच्या आमदारकीबाबतही त्यांनी कार्यकर्त्यांसमोर खुलासा केला. ‘विधानसभा लढलेल्यांना विधान परिषद नाही, हे पक्षाचे धोरण आहे,’ असं त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सांगितले. यातून ‘मला पक्षाचे धोरण मान्य आहे’ असे सांगण्याचा पंकजांचा प्रयत्न होता. तसेच आता आमदारकी, मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता थेट २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, हे सांगत असताना ‘पक्षाने तिकीट दिले तर…’ हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. ही दोन्ही विधाने म्हणजे ‘माझ्यामुळे पक्ष नाही, तर पक्षामुळे मी आहे’ याचीच कबुली आहे.

दुसरीकडे गत विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने वंजारी समाजातून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची खासदारकी, राज्य मंत्रिपद आणि लातूरमधील रमेश कराड यांना विधान परिषदेवर घेतले. पंकजांच्या राजकीय प्रवासात सर्वात मोठी साथ वंजारी समाजाची आहे. मात्र, याच समाजातील मुंडेंचेच समर्थक असलेल्या दोन कराडांना भाजपने शक्ती दिली. पंकजांचे राजकीय पंख छाटण्याचाच हा प्रकार होता. यावरही पंकजांनी कुणाचेही नाव घेता टिप्पणी केली. समाजात पदे दिली जात आहेत याचा आनंद आहे. मात्र, समाज बांधून ठेवणे किंवा समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांना हा समाजच क्षमा करणार नाही, असे पंकजा म्हणाल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे. दोन्ही कराडांना दिलेली पदे पंकजांना रुचलेली नाहीत.

डॉ. कराडांच्या दौऱ्यांमुळे समाजात गटबाजीची भीती सतावतेय डॉ. भागवत कराड हे तर मंत्री झाल्यापासून पंकजांचा ‘होल्ड’ असलेल्या भागात विशेषत: वंजारीबहुल भागात वारंवार दौरे करतात. यातून समाजात दोन गट पडण्याची भीती पंकजांना सतावतेय. आजघडीला पंकजा मुंडे आणि डॉ. कराड यांच्यात संवाद नाही हे सत्य आहे. या पार्श्वभूमीवर पंकजांचे वक्तव्य म्हणजे डॉ. कराड आणि कराडांना शक्ती देणाऱ्या नेत्यांना सूचक इशारा देणारे आहे.

बातम्या आणखी आहेत...