आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांचा नाद 500 कोटींच्या घरात:पुण्यात सर्वाधिक 120 पथके, महिलांचा सहभाग 40 टक्क्यांवर, ताशी 15-25 हजारांची बिदागी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पथकांना तासाला १५ ते २५ हजार बिदागी

बाप्पाचे स्वागत, आरती व विसर्जन मिरवणुका यांचे वातावरण भारावून टाकतात ती ढोल-ताशा पथके. पुण्याचा झांज, नाशिकचा ढोल, मुंबईचा ताशा अन् या तालावर फेटे व रंगीबेरंगी साड्यांसह सजलेले स्वयंसेवक गणेशोत्सवात चैतन्य आणतात. राज्यात ढोलपथकांची या उत्सवातील उलाढाल ५०० कोटींच्या घरात गेली आहे. १२ शहरांतील ३१४ पथकांशी संवाद साधून "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधींनी संकलित केलेला हा आढावा...

प्रत्येक पथकातील वाद्य आणि इतर गाेष्टींवरचा खर्च ढोल : 2800 ते 5000 रुपये प्रत्येकी (100 च्या पथकाला 40-50 ढोल) ताशे : 1000 ते 7500 रुपये प्रत्येकी (पथकामागे 15 ताशे) टोल : 3800 ते 4000 टोल गाडी : 15,000-40,000 ध्वज : 500 ते 2000 (प्रत्येक पथकात 11,21 याप्रमाणे) ध्वज कळस : 200 ते 2500 (स्टील ते पितळ यानुसार) ढोलची पाने : 550 ते 750 रुपये झांज : 800 ते 1500 रु. जोडी

पथकांना तासाला १५ ते २५ हजार बिदागी गणेश मंडळे पथकांना तासानुसार मानधन देतात. पुणे, नाशिक व नागपुरातील पथके तासाला २५ हजार; अकोला औरंगाबाद, सोलापूर २० हजार; जळगाव, अमरावती, कोल्हापुरात १५ हजार यानुसार मानधन ठरले आहे. मोठी मंडळे ३ ते ५ तासांसाठी पथके बुक करतात. प्रत्येक पथकास ७ ते १२ सुपाऱ्या मिळाल्या आहेत. प्रत्येक पथकाची यंदाची उलाढाल पाच लाखांपासून २० लाखांपर्यंत गेली आहे.

पुण्यात सर्वाधिक म्हणजे १२० पथके असून प्रत्येक पथकात १०० ते ६०० स्वयंसेवक आहेत. त्याखालोखाल जळगावमध्ये ४५, नाशिकमध्ये ४०, नागपुरात २५ अशी ढोलपथके आहेत. सर्वच पथकांनी साधारण महिना-दीड महिना आधीपासून सराव केला आहे. सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला या शहरांमध्ये खुल्या मैदानावर हा सराव करण्यात आला तर पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील काही पथकांना सरावासाठी भाड्याने हॉल घ्यावे लागले. त्यांचा खर्च ५ ते ५० हजारांचा होता. यंदा बहुतांश पथकांनी ५०० रुपयांची सदस्य नोंदणी केली आहे. लहान शहरांमध्ये हे शुल्क ३०० रुपये आहे, तर मोठ्या शहरांमध्ये ७०० रुपये.

महिलांचा लक्षणीय टक्का : आकर्षक व एकरंगसंगत वेशभूषा हे ढोलपथकांचे वैशिष्ट्य. बहुतांश पथके आपापला ड्रेस कोड ठरवत असून त्यासाठी प्रति स्वयंसेवक ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. मोठ्या शहरांमधील पथके स्वयंसेवकांसाठी खास ड्रेस डिझाइन करून घेतात, तर लहान शहरातील पथके सफेद कुर्ते, लाल दुपट्टे, भगवे फेटे असा ड्रेस कोड सांगतात. विशेष म्हणजे सर्वच पथकांमध्ये महिलांचा सहभाग सरासरी ४० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यांच्यासाठी नऊवारी साडी, नथ, फेटा हा मोठा ट्रेंड बनला आहे.

परराज्यांतून मागणी : सोलापूरच्या पथकांना हैदराबाद, कर्नाटक या ठिकाणी, नाशिकच्या ढोलपथकांना सुरत, इंदूर येेथील गणेशोत्सवात मागणी आहे. त्यासाठी वेगळे मानधन, ट्रक भाडे, बस भाडे व राहण्याचा खर्च आयोजक करतात. नागपूरच्या शिवप्रताप ढोल-ताशा पथकाला तर संपूर्ण भारतातून मागणी असल्याची माहिती पथकाचे संचालक किशोर दिंकोडवार यांनी दिली. या पथकाच्या ६ शाखा असून ते आसाम, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेेश व ओडिशा अशा विविध राज्यांमध्ये जाऊन वादन करतात. सर्वाधिक खर्च वाद्यांचा : नव्याने सुरू होणाऱ्या पथकांसाठी वाद्यांमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागली. हा आकडा २ लाखांपासून १० लाखांच्या घरात होता. पुढे प्रतिवर्षी वाद्यांची देखभाल व दुरुस्ती यासाठी ५० हजारांपासूनचा खर्च येत असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. या १२ शहरांतील पथकांनी यंदा खरेदी केलेल्या वाद्यांचा खर्च ५० लाखांच्या घरात गेला होता.

असे असते पथकांचे व्यवस्थापन - एका पथकात 50 ते 200 स्वयंसेवक - 30 ते 45 दिवसांचा सराव - मोकळ्या मैदानावर किंवा भाड्याच्या हॉलमध्ये - त्याचे भाडे 5 ते 50 हजार - वाद्यांसाठी 2 लाखांची खरेदी, 50 हजार दुरुस्ती - वेशभूषेसाठी प्रत्येक स्वयंसेवकामागे 500 ते 2 हजार रु. - 500 रुपये नोंदणी शुल्क, बहुतांश ठिकाणी मोफत - मानधन ताशी 15 हजार ते 25 हजार रुपये - सरासरी 7 ते 15 सुपाऱ्या, 1 ते 3 तास वादन

बातम्या आणखी आहेत...