आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:इलेक्ट्रिक बसमध्ये फिरून पाहता येणार वेरूळच्या 34 लेण्यांचे वैभव, पुरातत्त्व खाते खरेदी करणार 20 ई-वाहने

औरंगाबाद / महेश जोशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ लेणीचे तब्बल २.२ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी होणारी पायपीट आता सुलभ आणि पर्यावरणपूूरक होणार आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने लेणी परिसरात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने खरेदी करण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात एसी आणि नॉन एसी २० वाहने घेतली जातील. त्यासाठी ३० ते ४० रुपयांचे तिकीट लागेल. या वाहन खरेदीसाठी प्रस्ताव मागवण्यात आलेेले आहेत. वेरूळच्या ३४ लेणींचे भलेमोठे अंतर पार करताना पर्यटकांची दमछाक होते. उन्हाळ्यात हा त्रास अधिकच जाणवतो. या ठिकाणी एसटी महामंडळाची बस धावते. परंतु अजिंठा लेणीप्रमाणे ती प्रदूषणमुक्त नसल्याने लेणीला धोका निर्माण होतो. यावर पर्याय म्हणून पुरातत्त्व खाते येथे बॅटरीवर चालणारी पर्यावरणपूरक वाहने खरेदी करणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली.

अमित देशमुखांच्या गाड्या डेपोतच : वेरूळला ई-बस, ई-रिक्शा चालवण्याबाबत वेळोवेळी घोषणा होतात. परंतु त्या पहिल्यांदाच प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी वेरूळच्या शहाजीराजे गढीस भेट दिल्यानंतर वेरूळ लेणीसाठी ईलेक्ट्रिक बस सुरू करण्याची घोषणा केली होती. ती तेव्हा पूर्ण हाेऊ शकली नव्हती.

५ एसी, १५ नाॅन एसी गाड्या
पर्यटकांना एका लेणीपासून दुसऱ्या लेणीपर्यंत ने-आण करण्याचे काम बॅटरीवर चालणारी २० वाहने करतील. यात ५ एसी आणि १५ नॉन एसी वाहने असतील. एसी वाहनात ७, तर साध्या वाहनांत १५ आसन क्षमता असेल. लेणीच्या तिकिटाशिवाय वाहनासाठी वेगळे तिकीट घ्यावे लागेल. ते ऐच्छिक असेल. पर्यटकांना पायी लेणी बघण्याचा पर्यायही खुला राहील. वाहनासाठी ३० ते ४० रुपयांदरम्यान तिकीट लागेल. एकदा तिकीट काढल्यावर ते दिवसभर चालेल. एका वाहनातून एक लेणीत गेल्यावर पुढील लेणीसाठी दुसऱ्या वाहनात बसता येईल.

पाच ठिकाणी बस स्टॉप
लेणी मार्गावर ५ ठिकाणी बसस्टॉप उभारले जातील. लेणी परिसराच्या बाहेर ही वाहने उभी करण्यासाठी खास डेपोसारखी जागा दिली जाईल. येथेच त्यांचे चार्जिंग स्टेशन असतील. वाहने खासगी कंत्राटदारामार्फत चालवले जातील. ही सेवा १ जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार होता. परंतु तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नाही झाले. आता पुढील महिन्यात लेणी परिसरात बॅटरीवरील वाहने धावतील.

बातम्या आणखी आहेत...