आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांची सूचना:क्रीडा संकुलास निधी कमी पडणार नाही, काम वेगात करा, सर्व नावे मराठीत लिहा; ​​​​​​​चिकलठाण्यातील 37 एकर जागेवरील प्रस्तावित स्टेडियमचे भूमिपूजन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिकलठाण्यातील ३७ एकर जागेवर उभे राहतेय सुसज्ज क्रीडांगण

जिल्हा क्रीडा संकुलाचे काम संकल्प व सिद्धीप्रमाणे पूर्ण करा, काही अडचणी आल्यास आम्ही त्या सोडवू. खेळासाठी व संकुलासाठी पैसा कमी पडू देणार नाही. कोरोना काळात खूप वेळ वाया गेला आहे, त्यामुळे वेगाने काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. संकुलातील सर्व इमारतींवर नावे मराठी भाषेत लिहावीत, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. चिकलठाणा परिसरातील सावंगी बायपास भागात ३७ एकरमध्ये तयार होणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमिपूजन रविवारी झाले त्या वेळी ते बाेलत हाेते. आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक अास्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या मैदानावर झाडे लावण्यात आली. प्रस्तावित क्रीडा संकुलासाठी शासनाने १६ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी ३ कोटी ८४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, बहुउद्देशीय बंदिस्त प्रेक्षागृह, पिण्याच्या पाण्याची विहीर आणि पाण्याची टाकी अशी चार कामे होतील. निसर्गराजा कंपनीने हे काम घेतले आहे.

पालकमंत्री म्हणाले, ‘क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ज्या काही सूचना असतील त्या सर्वांनी अवश्य द्याव्यात, त्याची पूर्तता आम्ही नक्की करू. औरंगाबादच्या खेळाडूंमुळे जिल्ह्याचे नाव अभिमानाने घेतले जाईल, असे संकुल उभारले जाईल. खेळाच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध होतील व मोठ्या स्पर्धा घेतल्या जातील,’ अशी ग्वाही देतानाच ठरलेल्या वेळेत संकुलाचे काम पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. तर पीपीटीमधील इंग्रजी नावे पाहून नाराजी व्यक्त करत देसाईंनी ‘सर्व नावे मराठी टाकायला हवीत,’ असे म्हणत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे कानही टाेचले. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘इथे काही शेतकरी शेती करत होते. शासनाने जागा संकुलाला दिल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. केवळ रस्ता सोडण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी मान्य केली.’

खेळाडू, संघटनांना निमंत्रण नाही
जिल्ह्यात अनेक मोठे खेळाडू असताना आणि विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे उद्घाटनप्रसंगी एकही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू हजर नव्हता. केवळ एक-दोन शिवछत्रपती पुरस्कार विजेते हजर होते. पालकमंत्री पोहोचण्याच्या ५ मिनिटे आधी स्वागत कमानी लावण्यात आल्या.

‘आधी मैदाने, नंतर बांधकामे करा’
या संकुलाच्या जागेत पाझर तलाव आहे. तो तसाच ठेवून त्याचा उपयोग करावा. आधी कमी खर्च लागणारी मैदाने तयार करण्यात यावीत. त्यानंतर मोठी बांधकामे, हॉल उभारावेत. ज्यामुळे खेळाडूंची रेलचेल वाढेल. तसेच मेल्ट्राॅन रुग्णालयापासून संकुलापर्यंत रस्ता केल्यास खेळाडूंना मोठा फेरा वाचेल, अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली.

ही मैदाने अन‌् सुविधा उभारणार
क्रीडा संकुलात स्केटिंग, बास्केटबॉल, मल्टीपर्पज हॉल, जिम्नॅशियम, योगा, जिम, टेबल टेनिस, बॉक्सिंग, शूटिंग रेंज, धनुर्विद्या, भारोत्तोलन, कुस्ती, बॅडमिंटन हॉल, सिंथेटिक कोर्ट, ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, ड्रेनेज व वॉकिंग पाथवे, अंतर्गत रस्ते, सौरऊर्जा प्रकल्प, शेडसह पार्किंग सुविधा, वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.
क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करताना पालकमंत्री देसाई, जिल्हाधिकारी व लाेकप्रतिनिधी.

बातम्या आणखी आहेत...