आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआईचे निधन होताच वडिलांनी वर्षभरात दुसरे लग्न केले. सावत्र आई तिच्या आधीच्या पतीपासून झालेल्या मुलासह घरात आली. नंतर तिला दुसरे मूलदेखील झाले. मात्र, तेव्हापासून मला तिने त्रास देणे सुरू केले. आता तर मला स्वयंपाकघरात पाणी पिण्यासदेखील परवानगी नाही. लोकांकडे धुणीभांडी करायला पाठवते. तुला शिक्षणाची काय गरज? लग्न लावते, तू निघून जा, असे टोमणे मारते. सातवीत शिकणाऱ्या नेहाने (नाव काल्पनिक आहे) हा प्रकार शिक्षिकेला सांगताच तिचे मन हेलावून गेले. तिने तत्काळ दामिनी पथकाला संपर्क केला. पथकाने धाव घेत नेहाचे वडील व सावत्र आईला आयुक्तालयात हजर राहण्याचे आदेश दिले. तेव्हा दोघांनी गयावया करत पोलिसांसमोर नेहाची माफी मागत यापुढे त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले.
पुंडलिकनगरात राहणाऱ्या नेहाच्या वडिलांनी एक, दोन नाही तर तब्बल तीन लग्ने केली. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना नेहा झाली. वडिलांची लाडकी असलेल्या नेहाच्या आईचे ती तिसरीत शिकत असतानाच निधन झाले. त्याच्या वर्षभरात वडिलांनी पुन्हा तिसरे लग्न करत सावत्र आई घरात आणली. सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तिने छळ सुरू केला. विनाकारण मारहाण करून रागवू लागली. तेवढ्यावर न थांबता माझ्या परवानगीशिवाय स्वयंपाकघरातून काहीच खायचे नाही, असे दरडावले. शाळेत जाताना डबा देणे बंद केले. शिवाय खऱ्या आईच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी मज्जाव केला. तेरा वर्षांची नेहा या प्रकारामुळे पुरती तणावाखाली गेली.
डबा का आणत नाही? असे विचारताच रडू लागली : अभ्यासात हुशार आणि चंचल असलेली नेहा अचानक शांत झाली. शाळेत मैत्रिणींच्या हा प्रकार लक्षात आला. डबा का आणत नाही? असे विचारल्यानंतर ती ओक्साबोक्शी रडायची. हा सर्व बदल तिच्या वर्गशिक्षिकेच्या लक्षात आला. २ फेब्रुवारीला शिक्षिकेने विश्वासात घेत विचारपूस केली तेव्हा नेहाने सावत्र आईकडून होत असलेला छळाचा पाढा वाचला. शिक्षिकेने तिला घरी न पाठवता तत्काळ दामिनी पथकाला कॉल केला. निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या सूचनेवरून निर्मला निंभोरे, कल्पना खरात, मनीषा बनसोडे यांनी धाव घेतली. नेहाची आपबीती ऐकून आमच्याही अंगावर शहारे आले, असे महिला पोलिसांनी सांगितले.
दामिनी पथकाला म्हणाली, मलाही सावत्र आईने त्रास दिला... पथकाने नेहाच्या तक्रारीची दिवसभर शहानिशा केली. परिसरातील नागरिक, नातेवाइकांकडे माहिती घेत घटनेची सत्यता तपासली. प्रकरण खरे असल्याचे समजताच आईवडिलांना बोलावले. वडिलांनी मी दिवसभर बाहेर असतो, मला यातले कधी काही कळलेच नाही, अशी बाजू मांडली, तर सावत्र आईने धक्कादायक कारण दिले. मलाही माझ्या सावत्र आईने त्रास दिला, असे सांगत स्वत:च्या छळाचे समर्थन केले. त्यामुळे पोलिसांचा संताप झाला. त्यांनी फैलावर घेताच ती नरमली व पोलिसांसह नेहाची माफी मागत त्रास न देण्याचे आश्वासन दिले. तरीही नेहाने घरी जाण्यास नकार दिला. तिच्या विनंतीवरून पोलिसांनी तिला वडिलांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या बहिणीकडे सुपूर्द केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.