आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेची घरापासूनच सुरुवात,  उपविभागीय अधिकारी खेडेकर यांच्या उपक्रमाला उपविभागातील अनेक गावांचाही प्रतिसाद

हिंगोली ( मंगेश शेवाळकर )3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात टाकाऊ वस्तूंपासून आरास तयार करा, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापन करा अशा सूचना शासकीय स्तरावरून दिल्या जातात. मात्र कळमनुरी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी स्वतःच्या घरापासूनच या बदलाची सुरुवात केली. तसेच उपविभागातील गावांनीही नवीन बदल स्वीकारला असून या वर्षी केवळ १३५ ठिकाणीच गणेशमूर्ती स्थापन झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेश मूर्ती स्थापन करण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी उपविभागातील १२५ गावांतील गावकऱ्यांना साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या शिवाय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करावी, असे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी देखील टाकाऊ वस्तूंपासून मंदिर तयार केले. तसेच घरीच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली. या गणेश मूर्तीची स्थापना केली. घरी असलेले रिकामे बॉक्स व इतर वस्तूंना रंगकाम करून आकर्षक मंदिर उभारले व त्या ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. जनतेला आवाहन करून नव्या बदलाची सुरुवात घरापासूनच करावी या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. दरम्यान केवळ शासकीय बैठका घेऊन त्यातून त्याच त्या सूचना देण्याऐवजी उपविभागीय अधिकारी खेडेकर यांनी या बदलाची स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना
उपविभागीय अधिकारी खेडेकर यांनी बैठकांमधून केलेल्या आवाहनानुसार कळमनुरी उपविभाग यामध्ये या वर्षी केवळ १३५ ठिकाणी गणेश मूर्ती स्थापना झाली आहे. बहुतांश ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आला असून सुमारे शंभरपेक्षा अधिक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी बनवल्या मूर्ती
यासोबतच खेडेकर यांच्या आवाहनानुसार कवडा येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील चित्रकला शिक्षक दिलीप दारव्हेकर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या गणेशमूर्ती गणेश मंडळ व गावकऱ्यांना मोफत दिल्या.