आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोरोना विषाणूच्या संरचनेत वर्षभरात 4 हजार वेळा बदल, आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर

औरंगाबाद / रोशनी शिंपीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरापासून आपले कोरोनाशी युद्ध प्रतिबंधात्मक उपाय, औषधोपचार आणि लसीकरण अशा तीन आघड्यांवर सुरू आहे. त्यात असे लक्षात आले आहे की, कोरोनाचा विषाणू दिवसाला १० वेळा संरचना बदलतो. वर्षभरात त्याच्या संरचनेत ४ हजार वेळा बदल झाले आहेत. असे असले तरी त्याचा फैलाव रोखणे शक्य आहे. त्यासाठी जगभरात लसी तयार झाल्या आहेत. काही होत आहेत. त्या प्रायोगिक असल्या तरी उपयुक्त ठरत आहेत. कारण, लसीकरणानंतरही कोरोनाची लागण झाल्यावर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवींद्र वानखेडकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. या मुलाखतीतील काही प्रश्नोत्तरे अशी.

लसीकरणात गरीब- श्रीमंत देश भेदभाव होतोय. त्याचा काय परिणाम होईल?
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आता व्हॅक्सिन इक्विटीचा मुद्दा उचलला आहे. कारण, श्रीमंत-विकसनशील देशांत लसी निर्माण झाल्या. लसीकरणही होत आहे. डब्ल्यूएचओअंतर्गत १९२ देश आहेत. यातील १०० देशांत अजूनही लसीकरणाचा विषयही नाही. पण, शिक्षण आणि आरोग्य हा सर्वांचा मूलभूत हक्क असल्याने सर्वांना लस मिळालीच पाहिजे. शिवाय तुम्ही काही देशांत लसीकरण केलेे नाही तर फैलाव वाढेलच. भारतातील लसीकरण जगभरात सर्वोत्तम आहे. गेली अनेक वर्षे आपण विविध लसी देत आहोत. लसीकरणात आपली यंत्रणा जगभरात क्रमांक एकवर आहे.

लस घेतल्याचा फायदा होत नाही, असे काही लोक म्हणतात. ते खरे आहे का?
लसीकरण झाले म्हणजे कोरोना होणारच नाही, असे लोकांना अपेक्षित आहे. मात्र, मी आधी म्हटल्याप्रमाणे कोरोनाचा विषाणू संरचना बदलतोे. कोणतीही लस प्रभावी होण्यासाठी साधारण ३ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो. सध्या बाजारात असलेल्या सर्वच देशांच्या लसी प्रायोगिकच आहेत. मात्र, लसींमुळे फैलाव होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. हा फायदा झालाच आहे. अर्थात, १०० टक्के अपेक्षित परिणाम अद्याप दिसत नाही. लस किती काळ प्रभावी ठरेल याचे उत्तर काळच देईल.

अँटिबॉडी चाचणी करणे चुकीचे किंवा गरजेचे आहे का?
हल्ली अनेक जण अँटिबॉडी चाचणीवर भर देत आहेत. ही चाचणी करणे चुकीचे नाही. पण, केलीच पाहिजे असे आवश्यकही नाही. कारण, सातत्याने होणाऱ्या बदलामुळे ही चाचणी करणे फारसे उपयुक्त नाही. विनाकारण पैसे घालवले जात आहेत.

आरोग्य कर्मचारी लस का घेत नाहीत?
एका अभ्यासानुसार लसीकरणाचा दुसरा डोस १२ हप्त्यांनी घेतला तर परिणाम उत्तम दिसतो. त्यामुळे अनेक जण उशीर करत आहेत.

भारतीय लसी किती परिणामकारक?
भारतीय लसी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वाधिक उपयुक्त आहेत यात मुळीच शंका नाही. आतापर्यंत जी कोव्हॅक्सिन दिली गेली ती तिसऱ्या फेजची होती. लसीकरण करताना आम्ही ट्रायलमध्ये सहभागी होत आहोत, असा अर्ज भरून घेण्यात आलेला असेल. आता मात्र त्याची गरज नाही. सध्या ७ ते ८ भारतीय लसी बाजारात येण्याच्या तयारीत आहेत.

व्हॅक्सिन डिप्लोमसीबद्दल आपले मत काय आहे?
भारत स्वत: लस निर्माण करत आहे. आपल्या देशात त्या दिल्या जात आहेत. पण, आजूबाजूच्या देशांनाही आपण देत आहोत. व्हॅक्सिन डिप्लोमसी ही चांगली भूमिका आहे. पण, केंद्राने लसीकरणाचा सगळा व्यवहार स्वत:च्या हातात ठेवला आहे. त्याचे विकेंद्रीकरण करायला हवे.

काळाबाजार वाढण्याची शक्यता : खासगी आरोग्य यंत्रणेमुळे बनावट लस, लसीचा काळाबाजार होऊ शकतो. त्यामुळे प्रभावी नियंत्रणानंतर खासगी यंत्रणेचा सहभाग हवा. अनेक रुग्णालयांनी विमा पॉलिसीद्वारे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना लुटले, असेही ते म्हणाले.

...तर पाच महिन्यांत ५० कोटी जनतेला लस देणे शक्य होईल : भारतात आरोग्यसेवा ३० सरकारी, ७० टक्के खासगी आहे. त्यामुळे खासगी यंत्रणेशिवाय लसीकरण वेगाने होणार नाही. ५० टक्के जनतेला कोविड संसर्ग किंवा लसीकरण होणार नाही, तोवर हर्ड इम्युनिटी विकसित होणार नाही. त्यामुळे खासगी यंत्रणेला संपूर्ण शक्तीने यात घेतले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...