आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रचंड वृक्षतोड, वाहनांचा वाढता वापर, औद्योगिकरण, कार्बन उत्सर्जन अशा विविध कारणांमुळे तापमानात सतत वाढ होत आहे. २०२२ हे गत १०० वर्षांतील सर्वाधिक उष्ण वर्ष राहिल्याची नोंद नासाने घेतली आहे. यात औरंगाबाद शहराचा देखील समावेश आहे. ५८ दिवस ३९ ते ४३.२ अंश सेल्सियस उच्चांकी पातळीवर तापमान राहण्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
जेथे कमी हवेचा दाब, आकाशात पावसाच्या ढगांची गर्दी, तेवढ्याच पट्ट्यात धो-धो पाऊस पडतो. उर्वरित ठिकाणी थेंबही पडत नाही. परिणामी कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. थंडीत ढगांची गर्दी व पाऊस पडून उकाडा जाणवतोय. त्यामुळे पोषक व कडाक्याच्या थंडीचे दिवस कमी झाले आहेत. उन्हाळ्यातही पाऊस पडत असून सूर्य आग ओकतोय. गतवर्षी ला निनाच्या प्रभावामुळे ८ दिवस उच्च तापमान राहिले. तर यंदाही ला निनाचा प्रभाव होता. काेल्हापूर, सांगली, रत्नागिरी आदी ठिकाणी पाऊस पडला. अन्य ठिकाणी तापमान जास्त राहिले. औरंगाबाद शहराचे तापमान प्रथमच ५८ दिवस सरासरी पेक्षा १ ते ४ अंश सेल्सियसपर्यंत जास्त राहण्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
पृथ्वीच्या वातावरणात १० लाख अणुबॉम्ब टाकल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेइतकी गर्मी : नासाच्या सॅटेलाइट डेटामध्ये पृथ्वीचे तापमान अभूतपूर्वरीत्या वाढल्याचे समोर आहे. मार्च २०२१ ते २०२२ पर्यंतचा डेटा तपासण्यात आला. पृथ्वीवर सूर्याकडून येणारी उष्णता मोठ्या प्रमाणात शोषली जातेय. मात्र सूर्यकिरणांच्या परावर्तनाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. यामुळे पृथ्वीचे वातावरण प्रचंड तापतेय. जमीन, समुद्राचे तापमान वाढले आहे. नासाच्या डेटानुसार हिरोशिमावर टाकलेल्या १० लाख अणुबॉम्ब इतकी उष्णता पृथ्वीच्या वातावरणात आहे. हा मानवजातीला धोक्याचा इशारा असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
मान्सूनची प्रतीक्षा : मान्सूनपूर्व पाऊस अद्याप दाखल झालेला नाही. तापमानाने पुन्हा चाळिशी ओलांडली आहे. उन्हाच्या काहिलीने लोक हैराण झाले आहेत. मात्र, तापमान मान्सूनचा पाऊस खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होण्यासाठी वातावरण निर्मिती होत आहे.
२३.०१८ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन
खरीप, रब्बीच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. ११ प्रमुख धरणांतील २३.०१८ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले. ६ नागरिकांचा व १५ पेक्षा अधिक पक्ष्यांचा उष्म्याने बळी गेला. पर्यटकांची संख्या रोडवली असून बाजारातील गर्दीही कमी झाली आहे. अति उष्म्याचा उद्योगावरही परिणाम झाला आहे.
यामुळे तापमान वाढले
वाळवंटी प्रदेशातून उष्ण वारे वाहून आले. वाहनांची संख्या वाढली आहे. कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत आहे. उष्णतेस पूरक प्रदेशात औरंगाबाद शहराचा समावेश होतो. औद्योगिकरण, वृक्षांची संख्या कमी व सिमेंटच्या इमारती व रस्ते उष्णता वाढीस कारणीभूत ठरतात. दगडी कोळसा, पेट्रोल डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे वातावरण अधिक तापते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.