आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागामीच्या नृत्यांजलीने रंगणार संगीत दीपोत्सव:त्रिपुरारी पौर्णिमेला शेंदुरवादात 500 दिव्यांनी उजळणार मंदिर

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथे ८ नोव्हेंबरला ५०० दिव्यांचा संगीत दीपोत्सव होणार आहे. श्री मध्वमुनीश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने आयोजित या उत्सवात महागामी गुरुकुलातील शिष्यांचा नृत्याविष्कार आणि वादनही अनुभवता येणार आहे. सिंधुरवदन गणेश मंदिरात सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा होईल.

दीपोत्सवानंतर पंकज शिरभाते यांचे व्हायोलिन वादन होईल. तबल्यावर प्रशांत गाजरे साथ देतील. कृष्णराज लव्हेकर यांचे गायन, तर संवादिनीवर शांतिभूषण चारठाणकर, तबल्यावर प्रशांत गाजरे साथसंगत करणार आहेत. याबरोबरच महागामीच्या नृत्यगुरू पार्वती दत्ता व गुरुकुल यांच्या शिष्या शीतल भांबरे, सिद्धी सोनटक्के, राधा जहागीरदार कथ्थक सादर करणार आहेत.

त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व: त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येत नव्हता. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते. नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

शेंदुरवादा गावाचे ऐतिहासिक महत्त्व शेंदुरवादा गावातील गणपतीला साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ मानले जाते. सुमारे ५ ते ६ हजार वर्षापूर्वी शेंदरसूर नावाचा राक्षस पंचक्रोशीत साधू, संत, ब्राह्मणांना त्रास देत होता. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानानंतर शेंदुरासुराचा वध गणपतीने केला. यावरूनच गावाला शेंदुरवादा असे नाव पडले. या वेळी दैत्यवधानंतर पुष्पवर्षाव झाला. गणेशवंदना करून आनंदोत्सव साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...