आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोडिझेल विक्रीचे गुजरात कनेक्शन:ट्रकला मोजमापाचे मशीन लावून सुरु होती विक्री, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा कुंभकर्णी झोपेत

हिंगोली22 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • गुजरात राज्यातून हे डिझेल ट्रकमध्ये विक्रीसाठी आणली जात होते.

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारात बायोडिझेल विक्रीचे गुजरात कनेक्शन असल्याचे उघड होऊ लागले आहे. विक्रेत्यांनी अद्यापपर्यंत कुठलेही कागदपत्रे सादर केले नसल्याने बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे, आठ दिवसांपासून सुरु असलेल्या डिझेल विक्रीकडे हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने कानाडोळा केल्याचा आरोप केला जात आहे. कळमनुरी तालु्क्यातील भाटेगाव शिवारात दोन दिवसांपुर्वी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या पथकाने छापा टाकून दोन ट्रकची चौकशी सुरु केली.

बायोडिझेलची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कळमनुरी तहसील कार्यालयाच्या पथकाला माहिती दिली. त्यानंतर या पथकाने घटनास्थळावर येऊन पाहणी केली. या संदर्भातील सविस्तर अहवाल महसुल विभागाने नुकताच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. तर सदर विक्रेत्याने बायोडिझेल विक्रीची कुठलीही कागदपत्रे अद्याप दाखवली नाही. त्यामुळे हा प्रकार बेकायदेशीरच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. तर या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन असल्याचही चर्चा सुरु झाली आहे.

ट्रकला मोजमापाची मशीन बसवून त्याद्वारे बायोडिझेल विक्री केली जात होती.
ट्रकला मोजमापाची मशीन बसवून त्याद्वारे बायोडिझेल विक्री केली जात होती.

गुजरात राज्यातून हे डिझेल ट्रक मध्ये विक्रीसाठी आणली जात होते. विशेष म्हणजे ज्या ट्रकमध्ये बायोडिझेल आहे त्या ट्रकला मोजमापाची मशीन बसवून त्याद्वारे बायोडिझेल विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. 78 रुपये लिटर दराने हे बायोडिझेल विक्री होत असल्याचेही महसुल विभागाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून हा प्रकार सुरु असतांना हिंगोलीचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुंभकर्णी झोपेत होते काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुचाकी चोरटे, दानपेटी फोडणाऱ्यांना ताब्यात घेऊन पाठथोपटून घेणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला हा प्रकार कसा कळाला नाही असा सवालही उपस्थित केला जात असून गुन्हे शाखेने याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान, महसुल विभागाने बायोडिझेलचे नमुने नागपुर येथे तपासणीसाठी पाठविले असून या नमुन्यांच्या अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महसुल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...