आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती मुर्मू यांची अपेक्षा:आदिवासींच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणणारे लोकोपयोगी संशोधन विद्यापीठाने करावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी समाजाचे राहणीमान, त्यांची वेशभूषा, आहार पद्धतीवरच संशोधन केले जाते. आदिवासींवर मूलगामी संशोधनच केले जात नाही. आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे लोकोपयोगी संशोधन करा, अशी सूचना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या वतीने देशाच्या आदिवासीबहुल भागातील १२५ कुलगुरूंची दिल्ली येथे दोनदिवसीय परिषद घेण्यात आली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनाही निमंत्रित केले हाेते.

२७ आणि २८ नोव्हेंबरदरम्यान आयआयटी दिल्ली, विज्ञान भवन येथे चर्चा झाली. त्यानंतर २८ नोव्हेंबरला दुपारी राष्ट्रपती भवनात सर्व कुलगुरूंना निमंत्रित केले होते. त्या वेळी द्रौपदी मुर्मू यांनी १२५ कुलगुरूंशी संवाद साधला. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम. जगदेशकुमार, इंडियन काैन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्चचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष पद्मश्री डॉ. जे. के. बजाज, केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण यांची उपस्थिती होती.

द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ‘विद्यापीठे आदिवासी समाजाच्या संदर्भात संशोधन करताना फक्त त्यांच्या लाइफस्टाइलला महत्त्व देताना दिसत आहेत. त्यांची आहार पद्धत, राहणीमान आदी अभिनिवेशावर खूप संशोधन झाले. पण त्यांच्या जीवनात काहीच बदल होत नाही. त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बदल व्हावेत अशा पद्धतीचे लोकोपयोगी संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला पाहिजे,’ अशा सूचना सर्व कुलगुरूंना केल्या.

आदिवासी स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास पुढे आणा : डॉ प्रमोद येवले मेळघाटातील आदिवासी समाजात अनेक प्रकारची औषधी निर्माण केली जातात. आदिवासी समाजातील काही जण तर तुटलेली हाडे नीट करण्यासाठी वनस्पतींच्या पानांचा खुबीने वापर करतात. या बाबी दुर्लक्षित राहिल्या आहेत. विद्यापीठांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा राष्ट्रपतींच्या भाषणाचा सूर होता. शिवाय आदिवासी समाजाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप प्रयत्न केले आहेत. आदिवासींचे योगदान पुढे आणण्यासाठी संशोधन झाले पाहिजे ही अपेक्षा त्यांना आमच्याकडून आहे, असे डॉ. येवले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...