आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेच्या मधल्या सुटीत, शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आजूबाजूला टवाळखोरांचे घोळके उभे राहून मुलींचे मोबाइलमध्ये फोटो काढतात. शाळेच्या मैदानांवर रात्री झालेल्या पार्ट्यांमधल्या बाटल्यांचे सकाळी खच साचलेले दिसतात. आमच्या शाळेला कंपाउंड नाही. त्यामुळे रिक्षाचालक शाळेकडे तोंड करून लघुशंका करतात. याची स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रार केली, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, अशी व्यथाच मुख्याध्यापकांनी थेट पोलिस अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यातही आम्ही टवाळखोरांची तक्रार केली तर आमची नावे त्यांना कळणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केल्याने शहरात टवाळखोरांची दहशत पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
शहरात गेल्या महिनाभरात शाळकरी, महाविद्यालयीन मुलींसोबत गंभीर प्रकार घडल्याच्या घटनांमुळे राज्यभर संताप व्यक्त केला गेला. त्यामुळे शहर व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालय, मनपा व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी बैठक आयोजित केली होती. ही बैठक शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत संत एकनाथ नाट्यमंदिरात झाली. या वेळी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस, उपायुक्त अपर्णा गिते, शीलवंत नांदेडकर, दीपक गिऱ्हे, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, जयश्री चव्हाण, संजीव सोनार, भरोसा सेलच्या निरीक्षक आम्रपाली गायकवाड, दामिनीच्या निरीक्षक सुषमा पवार उपस्थित होते.
मनपा, पोलिसांना गांभीर्य नाही का ? शाळेच्या आसपासची मैदाने, चौक, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या टवाळखोरांबाबात प्रकर्षाने तक्रारी समोर आल्या. मैदानांवर रात्री झालेल्या दारूच्या बाटल्यांचा सकाळी खच दिसतो. आम्ही याबाबत स्थानिक पोलिसांना तक्रारी केल्या. मात्र, एकदाही प्रतिसाद मिळत नसल्याच्या थेट तक्रारी समोर आल्या. शाळा, महाविद्यालयाला लागून चहाच्या हॉटेलवर बाहेरचे तरुण सिगारेट आेढतात. यात प्रामुख्याने मुकुंदवाडी, एमआयडीसी सिडको, छावणी, जिन्सी, पुंडलिकनगर, क्रांती चौक पोलिस ठाण्यांविषयी होत्या. शिवाय शाळेत येणाऱ्या मुलांच्या मार्गांवर कुत्र्यांचे घोळके उभे असतात. मैदान स्वच्छ करण्यासाठी, कुत्र्यांवर अटकाव करण्यासाठी वारंवार सांगूनही मनपा प्रतिसाद देत नसल्याची खंत जिन्सीतील मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
{ शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस, रिक्षाचालाकचे ओळखपत्र, माहितीची नोंद असावी. त्यांचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करावे. चालकांचे डोळेही तपासावे. { सन २०११ मध्ये राज्य सरकारने शालेय परिवहन समिती स्थापनेचे आदेश काढले आहेत. बहुतांश शाळांमध्ये समिती नाही. या समितीसह विशाखा समितीची ३ महिन्याला बैठक आवश्यक आहे. { मुख्याध्यापकांपासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत बाललैंगिक अत्याचार, शिक्षण कायद्याची माहिती द्या. शाळा-महाविद्यालयाच्या बदनामीपोटी घटना लपवू नका. अनेक शाळा पालकांना सांगून छेडछाड व इतर घटनांच्या तक्रारी पोलिसांपर्यंत न नेण्यासाठी दबाव आणतात. { शाळेत किमान एक तरी महिला शिक्षिका पाहिजे. बसवर महिला केअरटेकर हवी. { शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे महाग नाही. शाळेत विद्यार्थ्यांचा वावर असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा. { आईसारखा संवाद साधा, विश्वासात घ्या. मुले बोलतात. माध्यमांमध्ये समोर येणाऱ्या घटनांपेक्षा अधिक घटना तेव्हा कळतील. त्यांना नकार पचवायला शिकवा. { शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे खरेच कायदेशीर पालकत्व स्वीकारले आहे का हे एकदा स्वत:ला विचारा. { शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षकांना आय कार्डशिवाय प्रवेश नाकारावा. भेट देणाऱ्यांच्या नोंदणीसाठी सुरक्षा रक्षक नेमून गेटवरच नोंद करा. { पाल्यांच्या मोबाइलमध्ये पॅरेंटल कंट्रोल सिस्टिम सुरू करा. { तक्रार पेट्या ठेवा. समिती स्थापन करून त्या तपासा. कारवाई करा. { मदतीसाठी तत्काळ ११२ वर संपर्क करा. प्रत्येक वेळी दामिनी पथकाला पोहोचणे शक्य होत नाही.
पोलिसांनी सायरन न वाजवता यावे : मुख्याध्यापक {शाळा परिसरातील टवाळखोर शिक्षकांना जुमानत नाहीत. शाळा सुटल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी पोलिसांची गस्त असावी. {शाळांच्या मार्गांवर, कुत्र्यांचे घोळके असतात. त्यामुळे मोठा धोका असताे. {पोलिसांच्या वाहनाने सायरन न वाजवता यावे. सायरनमुळे टवाळखोर लगेच पळून जातात. {आम्ही तक्रारी करतो, आमची ओळख जाहीर करू नका. {शाळा-कॉलेजच्या मार्गांवर स्मार्ट सिटी बसच्या फेऱ्यांची संख्या वाढवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.