आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:वंदे मातरम् सभागृह चळवळीचे केंद्र बनावे ; शैक्षणिक धोरणात तंत्रज्ञानासोबत इतिहासही हवा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात वंदे मातरम् म्हणण्यासाठी विरोध होत असताना विद्यार्थ्यांनी ज्या जागेतून वंदे मातरम गाण्याची चळवळ सुरू केली त्याच ठिकाणी भव्य असे वंदे मातरम् सभागृह उभारण्यात आले. हे सभागृह चळवळीचे केंद्र बनावे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

९ डिसेंबर रोजी पाटील यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन झाले त्या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले, मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामात आहुती देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य पुढच्या पिढीला माहिती होणे अपेक्षित आहे. सध्याच्या इतिहासात याची सोय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलदेखील दोन पाने आहेत. तीदेखील गोष्टरूपाने. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अगदी संक्षिप्तपणे मांडण्यात आले आहे. आपली संस्कृती आजही जगाला दिशा दाखवणारी आहे. हे पुढच्या पिढीला कळायला पाहिजे यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात नव्या टेक्नाॅलॉजीसह पुढच्या पिढीला देशाच्या जाज्वल्य इतिहास कळावा याची काळजी घेतली जाईल. त्यासाठीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले आहे, असे ते म्हणाले.

या वेळी सहकारमंत्री अतुल सावे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, उदयसिंह राजपूत, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. उल्हास पाटील, कुलगुरू डाॅ. प्रमाेद येवले, के.व्हीएस सर्मा, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे, डॉ. सतीश देशपांडे, राजेंद्र सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी मराठवाडा गीत, वंदे मातरम सादर केले. वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हे सभागृह उभारण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

मराठवाडा विकासासाठी स्वतंत्र निधी द्या देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला जातो आहे. मुक्तिसंग्राम दिनालाही ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतंत्र निधी द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. गावातील मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मारकाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली.

वंदे मातरम सभागृह एजन्सीला चालवायला द्या सिडकोने हे सभागृह उभारले आहे. उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे असलेली ही इमारत विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ती एजन्सीला चालवण्यासाठी देण्यात यावी अशी सूचना करण्यात येणार आहे. व्यावसायिक कार्यक्रमांसाठी वेगळे भाडे, चळवळ, प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी वेगळे दर असतील. सभागृह शासनाकडे असले की त्याची काय अवस्था होते, हे सगळ्यांना माहिती आहे, असे पाटील म्हणाले.

लोकार्पणासाठी मंत्र्याची वाट पाहू नका अनेक महिने हाेऊनही मंत्र्यांची वेळ न मिळाल्यामुळे सभागृहाचे उद्घाटन होत नाही. यापुढे विकासकामांचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून वापरात आणावे. मंत्र्याचा वेळ मिळाला की त्यांची भेट आयोजित करून आढाव्याचा कार्यक्रम घ्यावा, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...