आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांविना 15 काॅलेजांचा कारभार:कुलगुरूंनी नियुक्तीसाठी दिली एक महिन्याची मुदत

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या १५ महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त प्राचार्य, प्राध्यापक आणि शैक्षणिक सुविधांची वानवा आहे. त्यांची कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी बुधवारी (८ मार्च) सुनावणी घेतली. मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक प्राध्यापक, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळेसह विविध त्रुटींची पूर्तता १० एप्रिलपर्यंत केली नाही तर पुढील सत्रात संलग्नीकरण दिले जाणार नाही, असा इशारा कुलगुरूंनी दिला आहे. एक महिन्याचा कालावधी दिला जाणार असल्याचे पत्र गुरुवारी संबंधित संस्थाचालकांना दिले जाणार आहे.

त्रुटी संस्थाचालकांना निदर्शनास आणून दिल्या आहेत. कुलगुरू डाॅ. येवले यांनी त्यावर संस्थाचालकांचे म्हणणे जाणून घेतले. सर्वच कॉलेजमध्ये मान्यताप्राप्त प्राचार्य नाहीत. मान्यताप्राप्त प्राध्यापकांची संख्याही पुरेशी नाही. काही कॉलेजला तर एकही प्राध्यापक मान्यताप्राप्त नसल्याचे निदर्शनास आले. सर्व कॉलेजांनी मुदत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. बुधवारी १५ महाविद्यालयांची सुनावणी झाली. २०२३-२४साठी संलग्नीकरण हवे असल्यास त्रुटींची पूर्तता करावीच लागेल. अन्यथा कॉलेजला ‘नो अॅडमिशन’ गटात टाकले जाईल, असा इशाराही कुलगुरूंनी दिला आहे.

७ कॉलेज बीडचे, धाराशिवच्या ४ काॅलेजांचा समावेश सर्वाधिक ७ कॉलेज बीडमधील आहेत. त्यात तुलसी काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स, गुरुकुल काॅलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, आर्ट-सायन्स अँड काॅमर्स काॅलेज, राजीव गांधी आर्ट-सायन्स काॅलेज, कला महाविद्यालय अाडस, आर्ट-काॅमर्स अँड सायन्स काॅलेज, भगवानराव केदार कॉलेज आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्सची सुनावणी झाली. जालन्यातील भारत काॅलेज ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, ओमशांती काॅलेज ऑफ एज्युकेशन, जिजाऊ आर्ट अँड सायन्स काॅलेज हे कॉलेज आहेत. धारा‌शीवच्या बिल गेट्स इन्स्टिट्यूट, महानंदा बीएड काॅलेज, काॅलेज ऑफ फिजिक्स, श्रमजीवी काॅलेज ऑफ एज्युकेशन आदीचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...