आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिवासी कँवर समाज. जिथे स्त्रियांच्या चेहऱ्यावर हनुवटीपर्यंत पदर घेण्याची प्रथा आहे, जिथे महिलांना घराबाहेर पडण्याआधी पुरुषांची परवानगी घ्यावी लागते, अशा समाजातल्या एका महिलेने पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत बंड केले. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत स्वतःची नवी ओळख निर्माण केली. स्वत:च्या समाजातल्या इतर स्त्रियांनाही न्याय्य हक्क मिळवून दिले. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ सामाजिक सुधारणांच्या समर्थनार्थ पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या या महिलेचं नाव आहे कुमारीबाई जमकातन. गडचिरोली जिल्ह्यातील कुमारीबाई जमकातन यांच्या याच समाजकार्याच्या सन्मानार्थ आणि आदिवासी महिलांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचा गौरव म्हणून त्यांना नुकताच ‘संघर्ष’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमेरिकास्थित मराठी माणसांनी स्थापलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील जंतर गावातला कुमारीबाईंचा जन्म. आईच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र, त्यामुळे त्रास होण्यास सुरुवात झाल्यामुळे कधी आत्याकडे तर कधी दुसऱ्या नातेवाईकांकडे असे करत कुमारीबाई आठवीपर्यंत शिकल्या. समाजातील प्रथेप्रमाणे वयाच्या पंधराव्या वर्षी लग्नबंधनात अडकल्या. लग्न करून त्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गावात आल्या. नवरा चौथी शिकलेला आणि मजुरी करून घर चालवणारा. मात्र, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेच्या माध्यमातून कुमारीबाईंना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी जीवनचित्र बदलण्याची किमया साधली.
स्त्रियांच्या बचत गटांपासून त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या कामाची सुरुवात केली. दिवसभर मजुरी करायला जावं लागत असल्याने बचत गटाच्या बैठका रात्रीच होत असतं. जिथे दिवसाच घराबाहेर पडायला परवानगी मिळताना मारामार तिथे रात्र बैठकांसाठी जाणे म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट. मात्र, कुमारीबाईंनी घरचा विरोध पत्करून ते धाडस केले आणि इतरांना करायला लावलं. त्यामुळेच आज अनेक जणी स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. हे काम करताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हेही त्यांना तीव्रतेने जाणवले. त्यासाठी आधी बारावी, नंतर मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. स्त्रियांसाठी असणाऱ्या कायद्याचा अभ्यास सुरू करून गावातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर बिगुल फुंकले. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या दहा टक्के निधी महिला आणि बालकल्याणासाठी मिळवला. हा लढा कुमारीबाईंसाठी सोपा नव्हता, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेसोबत बचत गटाच्या कामापासून सुरुवात करणाऱ्या कुमारीबाई महिला सक्षमीकरणाचे काम आज समर्थपणे करत आहेत. वयाच्या १८ व्या वर्षांच्या आधी मुलींचे लग्न करायचे नाही, ही गोष्ट त्यांनी समाजात ठसवली. त्याची फळे दिसू लागली आहेत. समाजातल्या मुली आज शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी कुमारीबाई आज भारतभर फिरून समाजामध्ये जागृती निर्माण करतात. फेडरेशनच्या माध्यमातून हिमाचल प्रदेश, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे येथे स्त्री सक्षमीकरणासंदर्भात प्रशिक्षण द्यायला त्या जात असतात. कँवर समाजात त्यांना मान आहे. कुमारीबाईंचा सर्व विषयांचा, कायद्यांचा चांगला अभ्यास आहे. अन्यायाविरुद्ध लढाई सुरू केलेल्या या लढाईचं फलित म्हणून समाजाच्या ग्रामसभेत स्त्रियांचा सहभाग, जातपंचायतीत स्त्रियांची बाजू ऐकून घेतली जाणे यासाठी त्यांनी ठामपणे भूमिका घेतली. परिणामी २००५ ला कोरची ग्रामपंचायतीतील कागदपत्रांमध्ये घरमालक म्हणून पत्नीचेही नाव पतीबरोबर नोंदवण्यात आले. कुमारीबाईंच्या कारकिर्दीतील ही महत्त्वाची कामगिरी. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरांशी लढा देत पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दूर सारून स्त्रियांना सक्षम करणाऱ्या कुमारीबाई जमकातन आदिवासी समाजातच नव्हे, तर इतरांसाठीही आदर्श ठरत आहेत.
हेमंत डोर्लीकर संपर्क : ९४०३९१४९८५
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.