आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगरात महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा ठराव कार्यकारी परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. कार्यकारी परिषदेने हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देऊन पुढील मान्यतेसाठी कृषी परिषदेस शिफारस केल्याचे कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरात महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे, यासाठी आमदार चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिला कृषी महाविद्यालय सुरू केले जाईल, अशी घोषणा केली होती.
१६ फेब्रुवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक झाली. यात आमदार चव्हाण यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी व कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते. कृषी विद्यापीठाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कृषी व तंत्र विद्यालय, फळ संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यरत असून फळ संशोधन केंद्रांतर्गत १२० हेक्टर व कृषी तंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत १२० हेक्टर अशी एकूण २४० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. संबंधित कृषी तंत्र विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र येथील शिक्षण व संशोधनासाठी लागणारी आवश्यक जमीन वगळून शहरात प्रस्तावित महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करून हा ठराव मंजूर केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.