आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयद्रावक घटना:माझ्या डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात बायको, मुलगा वाहून गेले!; रात्री दीड वाजता योगेश पडोळ यांनी हंबरडा फोडत सोसायटी सचिवांना फोनवरून दिली माहिती

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाडी गेली तरी चालेल, पण दाेघे वाचायला हवे हाेते

‘वेळ रात्री दीडची, आम्ही झोपेतच होतो. माझा फोन खणाणला, मी उचलला. तिकडून आमचा शेजारी योगेश पडोळ रडत रडत बाेलत हाेता. ‘माझी बायकाे आणि मुलगा गाडीसह वाहून गेले हाे..’ असे सांगत त्याने हंबरडाच फाेडला अन‌् फाेन कट झाला. त्यांचे ते वाक्य एेकून माझ्या काळजात धस्सं झालं.... औरंगाबाद येथील अरुणकुमार इजारदार यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना रविवारी मध्यरात्रीची हृदयद्रावक कहाणी सांगितली.

सातारा परिसरातील औराव्हिलेजिया सोसायटी, अालोकनगरात राहणारे योगेश रामराव पडोळ (३१) हे पत्नी वर्षा (२८) आणि मुलगा श्रेयन (३) यांच्यासोबत औंढा तालुक्यातील पोटा शेळके व असोला येथे नातेवाइकांच्या भेटीसाठी कारने गेले हाेते. रविवारी रात्री ते परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांचे मावस मेहुणे रामदास शेळके हेही गाडीत हाेते. रात्री जाेरदार पाऊस झाल्याने गोळेगाव- जवळाबाजार रस्त्यावरील आसोला ओढ्याला पूर आला होता. रात्री ९.३० वाजता पडाेळ यांची कार ओढ्याच्या मध्यभागी बंद पडली. त्यामुळे चौघेही गाडीच्या बाहेर पडले. मात्र पाण्याच्या वेगामुळे ते वाहायला लागले. रामदास यांना पोहता येत असल्याने ते वाचले, तर योगेश यांच्या हाताला झाडाची फांदी हाती लागल्याने ते बचावले.

मात्र वर्षा आणि श्रेयन हे पाण्यात वाहत गेले. साेमवारी सकाळी त्यांचा मृतदेहच सापडला. त्यापूर्वी स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत योगेश आणि रामदास यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रात्री दीड वाजता योगेश यांनी ग्रामस्थांच्या मोबाइलमध्ये आपले सीमकार्ड टाकून औरंगाबादेत त्यांच्या औराव्हिलेजिया सोसायटीचे सचिव अरुणकुमार यांना फोनद्वारे आपबीती कळवली. जवळच्या मित्रांना देखील योगेश यांनी फोन करून या दुर्घटनेची कल्पना दिली. रविवारी मध्यरात्रीच स्थानिकांसह जवळा बाजार पोलिसांनी वर्षा व श्रेयन यांची शाेधमाेहीम सुरू केली होती.

पहाटेच्या सुमारास वर्षा तर सकाळी ११ वाजता मुलगा श्रेयन हा ओढ्याच्या दहा किलोमीटर पुढे बेशुद्धावस्थेत आढळून आला. या दाेघांवर परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगाेली जिल्ह्यात कार वाहून गेल्याने औरंगाबादच्या माय-लेकराचा मृत्यू, पतीसह दाेघे बचावले

आणि शिक्षिका होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले...
नातेवाइकांकडे जाण्यापूर्वी वर्षा यांनी बीड बायपास येथील एका शाळेत शिक्षिका होण्यासाठी अर्ज केलेला होता. त्याच शाळेत मुलाचेही अॅडमिशन करण्याचे त्यांनी ठरवले हाेते. मात्र काळाने घाला घातल्याने आई व मुलाचे स्वप्न हिरावून घेतले, असल्याचे सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले.

गाडी गेली तरी चालेल, पण दाेघे वाचायला हवे हाेते
योगेश पडोळ यांनी अपार्टमेंंटमधील माधव चोडम यांची (एमएच २० सीएस १८७२) चारचाकी प्रवासात नेली होती. चोडम यांना या घटनेबाबत कळाले तेव्हा त्यांनी गाडी गेली असती तर चालले असते, पण आई व मुलाचा जीव वाचायला पाहिजे होता, अशी भावना व्यक्त केली

सोसायटीवर पसरली शोककळा...
योगेश पडोळ यांचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. साडेतीन वर्षांपासून ते औराव्हिलेजिया सोसायटीत राहत होते. योगेश हे काही वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीत अकाउंटंटचे काम करत होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शेंद्रा येथे स्वत:चा शेती औजारांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या दुर्घटनेची माहिती साेमवारी सकाळी कळाल्यावर संपूर्ण सोसायटीत शोककळा पसरली होती. सकाळी मनपाची घंटा गाडी गाणे वाजवत आली असताना रहिवाशांनी गाणे बंद करून त्यांना नम्रपणे पुढे जाण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...