आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमा विशेष:पत्नीची 45 दिवस झुंज सुरू होती, मी तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात भाग्यश्री काकडेला झाला कोरोना, घाटी रुग्णालयात 19 दिवस व्हेंटिलेटरवर उपचार

३५ वर्षांची भाग्यश्री काकडे काेराेना उपचारासाठी घाटीत दाखल झाली तेव्हा सात महिन्यांची गरोदर होती. तब्बल ४५ दिवस तिने मृत्यूला कडवी झुंज दिली. कारण, सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी जशी सावित्री यमाच्या पाठीमागे लागली, तसाच भाग्यश्रीचा सत्यवान पती विक्रम आयसीयूच्या दारात अक्षरश: ४५ दिवस उभा होता. अखेर त्याने तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. हे सांगताना घाटीच्या कोरोना विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या अंगावरही शहारे आले होते.

आजच्या युगात सत्यवानही सावित्रीला सोडवून आणण्यासाठी जिवाचे रान करतो, याची प्रचिती विक्रम व्यंकटराव काकडे यांच्या रूपाने आली. विक्रम म्हणाले, ‘सात महिन्यांची गर्भवती असलेल्या भाग्यश्रीला ३ सप्टेंबर २०२० पासून तीव्र डोकेदुखी सुरू झाली. ६ सप्टेंबरला तपासणी केल्यावर ती काेराेना पॉझिटिव्ह निघाली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले, पण एकाच दिवसात प्रकृती खालावली. ७ सप्टेंबरला रात्री १२ वाजता रिक्षाने घाटीत नेले. ‘घाबरू नकोस, मी कायम तुझ्यासोबत आहे.’ असे आश्वासन तिला देत होतो. तिने फक्त माझ्याकडे पाहिले, डोळ्यांतून अश्रू गाळले.

कारण, दहा वर्षांची साथ आता सुटणार असे तिला वाटले असावे. घाटीत बेड मिळण्यासाठी पहाट उजाडली. भाग्यश्रीची प्रकृती बिघडतच होती. अखेर १० सप्टेंबरला आयसीयू बेड मिळाला. किंचित दिलासा तर मिळाला, पण फार काळ टिकला नाही. कारण, प्रकृती वेगाने खालावत असल्याने लगेच व्हेंटिलेटर लावावे लागले. ९ वर्षांचा रुद्राक्ष आईची चौकशी करायचा आणि खूप रडायचा. ‘आता आई देवाघरी जाणार का? ती केव्हा परत येईल?’ असे त्याचे प्रश्न अस्वस्थ करत राहायचे.

व्हिडिओ कॉलवर दिला धीर
गरोदर आणि अति गंभीर असल्याने भाग्यश्रीवर काेणते उपचार करावेत, यासाठी डॉक्टर सतत मुंबई-पुण्यात चर्चा करत हाेते. मलाही ते सांगायचे. मी बाहेर जाऊन ओक्साबोक्शी रडत बसायचो. मेडिसिन विभागाच्या आयसीयूच्या दारातून मी एक क्षणही हललो नाही. डॉक्टर्स रागावून मला बाहेर पाठवायचे. मी ठरवले होते की, तिला बरे करूनच नेणार. आयसीयूत जाता येत नव्हते. पण, दारातून मी तिला पाहायचो. माझी तगमग डॉक्टर्स रोज पाहत होते. तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉलवर बोलणे करून दिले.

दररोज आयसीयू ३ ते ४ जणांचे मृत्यू होत होते. मी भाग्यश्रीला धीर द्यायचो, ‘तू घाबरू नकोस. आपली साथ इतक्यात संपणार नाही. कितीही मृत्यू झाले तरी तू आणि आपले बाळ सुखरूप परत घरी जाऊ.’ व्हिडिओ कॉलवर तिच्या श्वासांचा आवाजच माझ्याशी संवाद साधत असायचा. कारण, तिला बोलणेही शक्य नव्हते. मी मात्र बोलून तिला धीर देत होतो.’

पाच दिवसांनी बाळालाही कावीळ
‘कोविड बरा झाल्यानंतर १९ दिवसांनी व्हेंटिलेटर निघाले. तो क्षण आनंदोत्सवाचा वाटला. पण, तिची प्रकृती अतिशय नाजूक झाली होती. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता होतीच. ४५ दिवसांनी घरी पाठवण्यात आले. मात्र, घरी पुन्हा त्रास झाल्याने दुसऱ्यांदा घाटीत आणले. आणखी ४ दिवस उपचार केल्यावर घरी पाठवले. आता प्रश्न होता तो बाळंतपणाचा. आम्ही तिच्या खाण्यापिण्यावर भर दिला. प्रसूती कठीण असेल, असे डॉक्टर म्हणाले होते. त्यामुळे १५ दिवस आधीच तिला रुग्णालयात दाखल करावे लागणार होते. रोज सोनोग्राफी आणि एक्स-रे सुरू असल्याने बाळावर परिणाम होईल, असे सांगण्यात आले होते. २५ नोव्हेंबर २०२० ला भाग्यश्रीचे सिझेरियन झाले. अाम्ही मुलगा झाल्याच्या आनंदात होतो. ५ दिवसांनी बाळाला कावीळ झाली. त्यामुळे १८ दिवस घाटीच्या एनआयसीयूमध्ये ठेवावे लागले. तो पूर्ण बरा झाला आणि आम्ही घरी परतलो.’

डॉ. सीताराम आणि डॉ. श्रेयस यांची भूमिका मोलाची
विक्रम म्हणाले, मी २००० मध्ये औरंगाबादेत आलो. फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला. २००९ ला लग्न झाले. सुखाचा संसार सुरू होता. पण, अचानक कोरोनाने घाला घातला. भाग्यश्रीला काही झाले असते तर मी पूर्ण कोलमडून पडलो असतो. मेडिसिन विभागातील डॉ. सीताराम आणि डॉ. श्रेयस यांनी मला खूप साथ दिली.

असा पती पहिल्यांदाच पाहिला
डॉ. भट्टाचार्य म्हणाल्या, ‘विक्रमची पत्नीविषयी असलेली कळकळ आमचे मन हेलावणारी होती. पहाटे पाचपासून मध्यरात्री १ वाजेपर्यंत तो आयसीयूच्या दारात बसलेला दिसायचा. तू असे बसून काहीच होणार नाही. घरी जा. आराम करून ये, असे बजावल्यानंतर तो मेडिसिन इमारतीबाहेर जाऊन बसायचा. त्याची केविलवाणी अवस्था पाहून तिला वेगळ्या वाॅर्डात शिफ्ट केले. तेव्हा त्यांची भेट झाली. प्रेम इतके उत्कट असू शकते हे या दांपत्याने दाखवले. भाग्यश्रीला वाचवण्यासाठी डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत होतो. पण, यात तिच्या पतीचा सिंहाचा वाटा आहे.’

बातम्या आणखी आहेत...