आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणिक चुकां:संसाराचा बोल वाहता लागलास... ; कैद्यांच्या भजनाच्या सादरीकरणाने सारेच मंत्रमुग्ध

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजचे तणावपूर्ण वातावरण, नकारात्मक मानसिकता, गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांचा सहवास अशा गंभीर वातावरणात रोज जीवन कंठत असलेल्या कैद्यांनी शुक्रवारी हर्सुल कारागृहात चक्क तबला, पेटी, मृदंगाच्या तालावर अभंग, भजनाचे सूर छेडून आनंदी वातावरण निर्माण केले. क्षणिक चुकांमुळे आयुष्यभर शिक्षा भोगणाऱ्यांच्या या कैद्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या नामस्मरणाने मोठा उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजन आणि अभंग गायन स्पर्धेमुळे कारागृहांच्या निर्जीव भिंतींनी हा वेगळा क्षण अनुभवला.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त बंदीजनांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा झाली. राज्यभरातील २९ कारागृहांमध्ये या स्पर्धा घेतल्या जात आहेत. या वेळी कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव, वरिष्ठ कारागृह निरीक्षक एम. एस. पवार, सुशील बोर्डे, नीता टिपणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विवेक थिटे, संदीप राक्षे, सचिन जाधव, प्रकाश साळुंके, वैभव देशमुख उपस्थित होते.

तीन कैद्यांनी स्वत: रचलेला ‘संसाराचा बोल वाहता लागलास मरणाला, कशी साथी कुणाला बोल बोल बोल…..’ ही रचना सादर केली. तर ‘जग हे बंदीशाळा, जो तो पथ चुकलेला’ ही स्वरचित रचनाही सादर केली. यानंतर बंदी एकनाथ भोसले म्हणाले, आयुष्याचे भोग भोगायला इथे आलो आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर विठ्ठलाचे नामस्मरण करीत जनकल्याणाचे काम करीन. ८५ वर्षीय बंदी किसन मुनीश्वर म्हणाले की, इथे तणावपूर्ण, एकटेपणाच्या वातावरणात पांडुरंगाच्या नामस्मरणाने चिंतामुक्त होण्यास मदत होईल. भजन स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे पुढील आयुष्याची वाटचाल सुकर होईल,’ असा विश्वास बंदी काशीनाथ लहाने यांनी व्यक्त केला.

पुस्तके, वाद्ये कारागृहाला भेट दीना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने हार्मोनियम, तबला, पखवाज, १० जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराचा फोटो व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी ८२ पुस्तकांचा संच कारागृहास देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...