आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे जीव्हीपीआर कंपनीच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात सांगण्यात आले. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा यांनी कंपनी अतिउत्साहाच्या भरात पाणीपुरवठा योजनेसंबंधी सांगत असली तरी प्रत्यक्षात काम होत नाही. कंपनीचा पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्पासंबंधी कुठलाही अहवाल रेकॉर्डवर घेण्यापूर्वी खंडपीठाने मजीप्राची संमती घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी बुधवारी (१२ एप्रिल) दुपारी २.३० वाजता याचिकेचा निकाल सुनावण्यात येईल, असे स्पष्ट केले.
पाणीपुरवठा योजनेच्या जनहित याचिकेच्या यापूर्वीच्या सुनावणीत जीव्हीपीआर कंपनीच्या अत्यंत धिम्या गतीने काम करण्याच्या पद्धतीवर खंडपीठ नियुक्त समितीने नाराजी व्यक्त केली होती. कंपनीकडे उपलब्ध साधनसामग्री आणि कंपनी ज्या गतीने काम करीत आहे, त्यासंबंधी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्याविषयी खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला होता. जायकवाडीतून टाकण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे काम ३९ किमी असून केवळ १९ टक्के झाले. त्यामुळे खंडपीठाने मजीप्राच्या सचिवांना पाचारण केले होते. जुनी पाइपलाइन काढणे, तोडणे, आणि घेऊन जाणे एवढेच काम जेव्हीपीआरने वेळेत केल्याचे सांगितले.
मनपाचे टँकर सामान्यांना का मिळत नाहीॽ टँकर सर्वसामान्यांना का मिळत नाही, असा प्रश्न खंडपीठाने विधिज्ञ संभाजी टोपे यांना विचारला. टँकरची मागणी केल्यानंतर दुसरा दिवस उजाडला तरी टँकर मिळत नसल्याचा अनुभव नागरिकांना येतो, असे खंडपीठ म्हणाले.
जॅकवेलसाठी लागतील दोन सीझन सचिव कृष्णा यांनी स्पष्ट केले की, जॅकवेलच्या कामाला दोन सीझन लागतील. म्हणजेच काम डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होईल. कंपनीने क्रॉफर डॅमच्या कामासाठी काळी माती उपसण्याची परवानगी मागितली. मजीप्राच्या माध्यमातून जायकवाडी प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंतांकडे परवानगी मागितली जाईल. यावर १२ एप्रिल रोजी परवानगी देण्याचे निर्देश दिले.
उंचावरील टाक्यांना होतोय विलंब समितीच्या अहवालात उंच पाण्याच्या टाक्या अद्याप तयार झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. जायकवाडीतून शहरापर्यंत ३९ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. केवळ १९ टक्के काम झाले. अंतर्गत १९११ किमी लांबीची जलवाहिनी अंथरण्यात येणार असून २७२ किमीपेक्षा कमी काम झाले आहे. हायड्रोटेस्टिंग लाइनचे काम एक टक्क्यापेक्षा कमी झाले आहे. १८ किमीपेक्षा कमी लाइन टाकण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.