आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:... तर भुजबळ, वडेट्टीवारांचे मंत्रिपद बिनकामाचे सिद्ध होईल; भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांचा टोला

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार तयार करत असलेल्या ओबीसी समाजाच्या एम्पिरिकल डेटामध्ये चुका आहेत, हे उशिरा का होईना मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवारांनी कबूल केले.पण डेटा तयार होत असताना ते काय करत होते. त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केले, असा प्रश्न भाजप प्रदेश सरचिटणीस, आमदार अतुल सावे यांनी केला. आता डेटा अचूक झाला नाही तर या दोघांचे मंत्रिपद ओबीसींसाठी बिनकामाचे आहे, हेच सिद्ध होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

सावे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतीत गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार निव्वळ टाइमपास करीत आहे. एम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जात आहे, हे देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे बरोबरच आहे, असे भुजबळ, वडेट्टीवार म्हणत आहेत. मग हे मंत्री सरकारमध्ये बसून करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो.

मंत्रिपदी असूनही चुका होत असतील तर या नेत्यांचा ओबीसी समाजाला काहीच उपयोग नाही. समर्पित आयोग तुमच्या सरकारच्या अधिकारात काम करत आहे. म्हणजे सरकारच्या सांगण्यावरूनच या चुका होत आहेत. आयोगाला राज्यात दौरे करायला सांगण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला. त्याच दिवशी डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते. ते तर झालेच नाही. पण आता आडनावावरून जात ठरवली जात आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...