आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकांचे मत:हिंदुत्व कसे टिकेल याचे उत्तर मिळालेच नाही पण मरेपर्यंत साहेबांसोबत राहणार

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुत्वाचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत राहिल्याने शिवसेनेचे हिंदुत्व कसे टिकेल, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळालेच नाही, असे मत जुन्या पिढीतील शिवसैनिकांनी व्यक्त केले, तर नव्या पिढीतील शिवसैनिक म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही मरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच (साहेब) राहणार.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी ऑनलाइन भाषण केले. मला मुख्यमंत्रिपद नको. ‘मुख्यमंत्रिपद सोडा’ असे बंडखोरांतील एका आमदाराने सांगितले तरीही मी आता पदाचा राजीनामा देऊन टाकेल. मी पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे, असे ते म्हणाले. या भाषणाचा नेमका काय परिणाम झाला अशी विचारणा जुन्या पिढीतील काही शिवसैनिकांकडे केली असता ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुत्वाचे कट्टर विरोधक आहेत. त्यांच्यासोबत सत्तेसाठी भागीदारी केल्याने हिंदुत्व कसे टिकू शकते, हा आमचा मूळ प्रश्न आहे. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. उलट शिवसैनिकांनाच कोंडीत पकडणारे भावनिक आवाहन केले. ते त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. शिवसेनेच्या भवितव्यासाठी उपयोगी नाही.

मात्र, नव्या पिढीतील शिवसैनिकांनी याउलट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्या सेनेने रिक्षावाल्यापासून ते पानटपरीचालकांना आमदार-मंत्री केले त्यांनीच गद्दारी केली. त्यांना उद्धव ठाकरे यांनी जबर तडाखा दिला आहे. त्यांचे भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले. शिवसेना या संकटातून पुन्हा उभी राहील. माजी नगरसेवक राजू इंगळे म्हणाले, हे भाषण भावनिक, संयमी होते. युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे यांनी पक्षप्रमुख म्हणजे दैवत असल्याचे सांगितले.

ठाकरे कुटुंबासाठी पद कधीच महत्त्वाचे नव्हते मुख्यमंत्र्यांनी बुधवारी अतिशय भावनिक साद घातली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे ही त्यावेळची परिस्थिती होती. ठाकरे कुटुंबासाठी पद महत्त्वाचे नाही. आम्ही सगळे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहोत. - त्र्यंबक तुपे, माजी महापौर, शिवसेना

गेलेले सर्व परत येतील गेलेले सगळे आमदार परत येतील. देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आहेत. असे अनेक वार आतापर्यंत सेनेवर झाले, मात्र त्यातून शिवसेना पुन्हा उभी राहिली आहे. - अनिल जैस्वाल, माजी नगरसेवक,

मशिदीवरील भोंगे अन् संभाजीनगरचे काय झाले? मशिदीवरील भोंगे आणि संभाजीनगर हे तर शिवसेनेच्या हिंदुत्वाचे विषय आहेत. पण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेसाठी तडजोड केल्याने त्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधी, मवाळ भूमिका घेतली हे लोकांना कळून चुकले आहे. - राधाकृष्ण गायकवाड, माजी सभागृहनेता

बातम्या आणखी आहेत...