आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तज्ज्ञांचे मत:‘साहेब मी तुमचाच’ शपथपत्राद्वारे सांगणाऱ्यास कायद्याचे बंधन नाही

औरंगाबाद / सतीश वैराळकर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत वेगळी चूल मांडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी फूट टाळण्यासाठी उरलेल्या समर्थकांकडून आपल्याशीच निष्ठावंत असल्याचे शपथपत्र लिहून घेत आहेत. नुकतेच औरंगाबादेतील दोन हजार कार्यकर्त्यांची शपथपत्रे आमदार अंबादास दानवे यांनी ठाकरेंना वाढदिवशी ‘भेट’ दिली.आणखी ३ हजार देण्याचा मनोदयही जाहीर केला. दुसरीकडे शिंदेसेनेनेही ठाणे, मुंबईतून अशीच शपथपत्र गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. पण ‘खरेच या शपथपत्रावरील निष्ठेला कायद्याच्या दृष्टीने काही अर्थ आहे का?’ अशी विचारणा ‘दिव्य मराठी’ने कायदेतज्ज्ञांकडे केली असता त्याचे उत्तर नकारार्थीच मिळाले.

‘अशा राजकीय निष्ठा सिद्ध करण्यासाठीच्या शपथपत्रांना कोणतीही ‘पत’ नसते. निष्ठावंतांची बाँड पेपरवरची हमी हा फक्त भावनिक सोपस्कार आहे. दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये स्वत:च्या शपथपत्राची तरतूद करण्यात आली आहे. शपथपत्रात दिलेली माहिती खोटी आढळून आल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. परंतु पक्षीय राजकारणात अशा शपथपत्रास काही महत्त्व नसल्याचे विधिज्ञांनी सांगितले.

कार्यकर्ता कधीही पक्षांतर करू शकतो
अॅड. अभयसिंह भोसले यांनी सांगितले, पक्ष सदस्यता हा कायमचा विषय नाही. कार्यकर्ते म्हणजे एखाद्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेली व्यक्ती ही ‘स्वयंसेवक’ असते. ती स्वयंस्फूर्तीने केव्हाही कुठल्याही पक्षात सेवेसाठी जाऊ शकते. केवळ पक्ष सदस्य म्हणून दिलेल्या शपथपत्रास लोकशाही प्रणालीच्या व्यवस्थेत काहीच महत्त्व नाही. पक्षाची सदस्य संख्या दाखवण्यासाठी पक्ष रजिस्टर असते. निवडणूक आयोग काय निर्णय घेते त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. पक्षाची सदस्य नोंदणी व मतपत्रिकेद्वारे प्राप्त मतदान या दोन बाबी वेगळ्याच आहेत.’

पूर्वी शपथेवर सांगितलेले बदलण्याचा अधिकार
अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितले, शपथपत्र साक्षांकित करण्याचे अधिकार राजपत्रित अधिकाऱ्यांनाच असतात. विविध कार्यालयांच्या कक्षेत विविध अधिकारी यासाठी नियुक्त केलेले आहेत. उच्च न्यायालयात रजिस्ट्रारला अधिकार असे असतात. तर महसूल यंत्रणेत तहसील आणि समकक्ष अधिकाऱ्यांना असे अधिकार दिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीने स्वत:संबंधी दिलेले अधिकार नाकारण्याचा अधिकार त्याला आहे. पण एखादे शपथपत्र बदलण्यासाठी सुधारित नव्याने शपथपत्र दिले जाऊ शकते, त्यालाही ग्राह्य समजले जाते. स्वत:संबंधी यापूर्वी दिलेले शपथपत्र आपण बदलत आहोत. आता नव्याने मी त्या शपथपत्रात दिल्याप्रमाणे संबंधित पक्षाचा सदस्य नसून नव्याने हा पक्ष स्वीकारला असे म्हणण्याचे अधिकार त्याला आहेत. यातून त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचता येते.

बातम्या आणखी आहेत...